भाईंदर : गणेशोत्सवासाठी कोकणातील गावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना शनिवारी सकाळी घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका बसला. चेना पूल ते ओवळापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना जवळपास एक ते दीड तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे.
सोमवारी गणेशोत्सव असल्याने मिरा भाईंदर,वसई-विरारसह मुंबईच्या नागरिकांनी शनिवारपासूनच कोकणातील गावी जाण्यास सुरुवात केली. त्यामुळे घोडबंदर मार्गावर सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी झाली आहे.घोडबंदर अरुंद घाट मार्ग आणि वाढलेली वाहनांची संख्या यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.प्रामुख्याने हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात.मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांची भर पडल्याने शनिवारी सकाळी परिस्थिती अधिकच बिकट झाली.अवघ्या काही मिनिटांच्या अंतरासाठी वाहनचालकांना मोठा वेळ लागत होता.
परिवहन सेवेच्या बसगाड्याही कोंडीत अडकल्या आहेत.त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, या मार्गावरील खड्डे भरण्याचे काम काही दिवसांपूर्वीच प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार होते. मात्र, वाहनांची मोठी रहदारी असल्याने हे काम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे खड्डे आणि अरुंद मार्गामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत अजित भर पडली असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे. तर अत्यावश्यक कामासाठी निघणाऱ्या प्रवाशांनी मुंबईच्या मार्गाने देखील प्रवास करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.
