वसई : एका तरुणीला तिच्या माजी प्रियकराने बंद खोलीत अमानुष मारहाण करून विकृत कृत्य करायला भाग पाडल्याची धक्कादायक घटना मीरा रोड येथे घडली आहे. हा तरुण फरार असून काशिमीरा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पीडित तरुणी २१ वर्षांची असून ठाण्यात राहते. तिचे २२ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, एक वर्षांनंतर त्यांचे प्रेमसंबंध तुटले आणि तरुण कोलकाता येथे निघून गेला. काही दिवसांपूर्वी तो परत आला आणि त्या तरुणीच्या अश्लील छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून भेटायला बोलावले. काशिमीरा येथील एका लॉजमध्ये बोलावून तिला पट्टय़ाने अमानुष मारहाण केली. तसेच तिला थुंकी चाटण्यासाठी भाग पाडले.
याप्रकरणी बुधवारी तरुणीने काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, मारहाण अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुण फरार असून, त्याचा आम्ही शोध घेत आहोत, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन पोतदार यांनी दिली.