पापडी तलावाचा गेट अंगावर पडून पाच वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

वसई पश्चिमेकडील पापडी तलावाचा गेट अंगावर पडून एका ४ वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भूमिका मेहरे असं मुलीचं नाव आहे. भूमिका गुरुवारी संध्याकाळी तलावाजवळ गेटचा आधार घेवून उभी होती इतक्यात अचानक गेट तिच्या अंगावर पडला आणि त्यात ती गंभीर जखमी झाली. तेथील नागरिकांनी तिला तात्काळ पालिकेच्या रुग्णालयात नेलं, मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, या पापडी तलावाचे काम पूर्ण झाले आहे, मात्र ठेकेदाराने गेट व्यवस्थित ठेवले नसल्याने ही दुर्घटना झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या मुलीच्या पालकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.