वसई- नालासोपारा येथील एका शाळेत ७ वर्षाच्या चिमुरडीवर शाळेच्या स्वयंपाक्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संतप्त पालक आणि नागरिकांनी शाळेतच हल्ला बोल करत या स्वयंपाक्याला मारहाण केली. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांनी बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली. वसई पूर्वेला असलेल्या एका शाळेत बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. शाळेतील आचारी राजाराम मौर्या (५२) याने शाळेत ४ थी मध्ये शिकणार्या ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार समजताच पालक आणि परिसरातील नागरिक शाळेत जमू लागले. नागरिकांच्या आक्रमक पावित्र्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. नागरिकांनी या स्वयंपाकी मौर्या याला बेदम मारहाण केली. घटनास्थळी वालीव पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. आम्ही आरोपीला ताब्यात केली असून पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांनी दिली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी संध्याकाळ पर्यंत सुरू होती. हेही वाचा >>>तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलीन यांच्याविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल या प्रकारामुळे परिसरात अफवा पसरली होती. शाळा अनधिकृत असून त्यावर कारवाई कऱण्याची मागणी आम्ही पूर्वीपासून करत होतो, असे गावराईपाड्याचे माजी नगरसेवक मिलिंद घरत यांनी सांगितले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून वालीव पोलिसांनी शाळेच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.