वसई: वसई पूर्वेतील गोलानी नाका रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि चिखलामुळे औद्योगिक वसाहतीतील या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. खड्ड्यांमध्ये वाहनांची चाके अडकणे, वाहने घसरणे यामुळे रस्त्यांवरील अपघात वाढले असून कामगार, पादचारी आणि अवजड वाहनधारकांना येथून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे.

वसई पूर्व परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती आहेत. तसेच या परिसरातून महामार्गाला जोडणारे मार्गही गेले आहेत. मात्र, कमकुवत रस्त्यावरून अवजड वाहनांची वाढती वाहतूक आणि या रस्त्याच्या दुरुस्तीकडे पालिकेकडून होणारे दुर्लक्ष यामुळे वसई पूर्वेतील औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

गोलानी नाका येथील अग्रवाल रुग्णालयाजवळील रस्त्याची देखील अशीच बिकट अवस्था झाली आहे. ४ ते ५ लांब व खोल खड्डे आणि त्यातच पावसामुळे रस्त्यावर साचणारा चिखल यामुळे या भागातून वाहने चालवणे अतिशय आव्हानामक बनले आहे. तसेच मोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकी, तीनचाकी वाहने उलटणे, सांडपाणी आणि चिखलामुळे वाहने घसरणे, तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये अवजड वाहनाचे चाक अडकून वाहतूक कोंडी होणे, या दैनंदिन घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

हा औद्योगिक परिसर असल्यामुळे या रस्त्यावरून दररोज हजारो कामगार, व्यापारी आणि व्यावसायिक वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून या रस्त्याची साधी दुरुस्तीही योग्य पद्धतीने झाली नसल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. तसेच तात्पुरती मलमपट्टी न करता दीर्घकाळ टिकेल असा उत्तम दर्जाचा रस्ता बांधून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

खड्डेमय रस्त्यामुळे रुग्णांचेही हाल!

गोलानी नाक्याच्या हा रस्ता थेट अग्रवाल रुग्णालयाकडे जात असल्याने येथे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ असते. मात्र, खड्ड्यांमधून आणि चिखलातून वाट काढत गंभीर रुग्णांना रुग्णालयात नेताना  रुग्णवाहिका चालकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे.