भाईंदर : मुंबईच्या अंतिम टोकाला असलेला जवळपास आठ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा अखेर दिव्यांनी प्रकाशमान करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना आता रात्री फिरण्यासाठी नवी जागा उपलब्ध झाली आहे.

मुंबईच्या उत्तर-पश्चिम टोकाला असलेल्या द्वीपावर गोराई बीच आहे. या ठिकाणी मुंबईवरून जाताना बोटीचा वापर करावा लागतो, तर रस्त्याने जाण्यासाठी मिरा-भाईंदर मार्गे प्रवास करावा लागतो. प्रामुख्याने या बीचवर भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मागील काही वर्षांत वाढली असली, तरी रात्रीच्या वेळी येथे मोठ्या अडचणी उद्भवत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. विशेषतः किनारपट्टीवर दिवे नसल्यामुळे प्रचंड अंधार पसरत होता आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत होता.

त्यामुळे पर्यटकांच्या मनोरंजनात भर पडावी आणि रात्रीच्या वेळीही हा बीच खुला ठेवता यावा, यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर बृहन्मुंबई महानगरपालिका, डीपीडीसी आणि अदानी विद्युत संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बीचवर पथदिवे लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे मनोरी, गोराई ते वेलनकनीपर्यंत जवळपास आठ किलोमीटरचा हा किनारा आता प्रकाशमय झाला आहे.यामुळे पर्यटकांनी येथील समुद्राच्या लाटा, नैसर्गिक दगड, गार वारा आणि नारळाच्या बागांचा आनंद घेण्यासाठी येथे यावे, असे आवाहन बोरिवलीचे आमदार संजय उपाध्यय यांनी केले आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी येत्या काही दिवसांत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.