वसई/ विरार : राज्य शासन चांगले काम करू शकत नाही तर त्यांनी किमान अडथळा तरी निर्माण करू नये, असा टोला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लगावला. रविवारी विरार येथे अपंगांच्या वसतिगृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

करोनामुळे पालक गमावलेल्या अपंग मुलांकरिता विरारच्या अर्नाळा येथे नूतन गुळगुळे फाऊंडेशनतर्फे वसतिगृह आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘स्वानंद सेवा सदन’ या वास्तूचे भूमिपूजन संपन्न झाले. आपल्या भाषणात राज्यपालांनी अनेक कोपरखळय़ा मारल्या. जो अडथळे दूर करून त्यावर मात करत मार्ग काढतो तोच खरा आमदार, खासदार, मुख्यमंत्री आणि राज्यपाल असू शकतो असे सांगितले. लोककल्याणाची कामे करताना बाधारहित कामे सरकारने करावी असा सल्लाही राज्यपालांनी या वेळी दिला. मला ऐनवेळी हेलिकॉप्टर नाकारून रस्त्याने प्रवास करावा लागला. ते एका अर्थाने चांगले झाले कारण मला वसईची खरी परिस्थिती पाहता आली असेही त्यांनी सांगितले. या वेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार हितेंद्र ठाकूर, मुंबई माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे, फाऊंडेशनच्या अध्यक्षा नूतन गुळगुळे, जिल्हाधिकारी माणिक गुरसळ आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फाऊंडेशनला २५ लाखांची तसेच खासदार राजेंद्र गावित यांनी खासदार फंडातून १५ लाखांची मदत जाहीर केली.