वसई – वसई पूर्वेच्या चिंचोटी येथील रास्त भाव दुकानात चोरी केलेला धान्याचा साठा खाली केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे या दुकानात हेराफेरी होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
वसई पूर्वेच्या चिंचोटी- कोल्ही परिसरात ग्राहक सेवा संस्थेचे रास्त भाव दुकान आहे. या दुकानातून शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात धान्याचे वितरण केले जाते. मात्र बुधवारी रात्रीच्या सुमारास रास्त भावाच्या धान्याची चोरी केलेली पोती खासगी वाहनातून खाली करण्यात येत होती. हा सर्व प्रकार येथील स्थानिक ग्रामस्थ दयानंद वाघ, नवशी वाघ, कमलाकर गोरात या गाव कमिटीतील सदस्यांना कळताच त्या ठिकाणी जाऊन हा टेम्पो पकडण्यात आल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली आहे. दुसऱ्या ठिकाणाहून हा माल आणून या ठिकाणी खाली केला जात होता. गरजूंना पुरेसे धान्य देण्यासाठी साठा मिळत नाही तर दुसरीकडे छुप्या मार्गाने धान्याची पोती लंपास केली जात असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. तसेच धान्याचा अशा प्रकारचा काळाबाजार करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
नागरिकांनी पुरवठा विभागाला त्याची माहिती दिली आहे. त्या माहितीच्या आधारे या ठिकाणी पुरवठा निरीक्षक पाठवून याची पाहणी करून तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आली असल्याचे तालुका पुरवठा अधिकारी रोशन कापसे यांनी सांगितले आहे.