वसई: ग्रंथ मुथा मृत्यूप्रकरणानंतर मिरा भाईंदर महापालिकेने ठेकेदाराचे कंत्राट रद्द करत ४१ लाख रुपये वसूलपात्र रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, जवळपास तीन उलटून गेल्यानंतरही ठेकेदाराने ही रक्कम भरली नसल्याने पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच अशी गंभीर प्रकरणे बेजबाबदारपणे हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही आता केली जात आहे.

भाईंदर पूर्वेतील महापालिकेच्या गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुडून २० एप्रिल २०२५ रोजी ११ वर्षाच्या ग्रंथ मुथा या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर झालेल्या चौकशीत ठेकेदाराने सुरक्षेच्या अटींचे उल्लंघन केल्याचे, विनापरवानगी उन्हाळी शिबीर चालवल्याचे आणि सदस्यांकडून अतिरिक्त तसेच अनधिकृत फी वसूल केल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर पालिकेने करारनामा रद्द करत नवघर पोलीस ठाण्यात ठेकेदार रमझान हसनानी व निरज किल्ला शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

तसेच ठेकेदार मे. साहस चॅरिटेबल ट्रस्टने महापालिकेच्या फंडात जमा केलेली १ कोटी ९ लाख २९ हजार इतकी रक्कम १ कोटी ५० लाख ४२ हजार ५४५ वसुलपात्र रकमेतून वजा केल्यानंतर उरलेली ४१ लाख १३ हजार ५४५ रुपये रक्कम १५ दिवसात पालिकेकडे जमा करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी १६ मे २०२६ दिले होते. मात्र, निर्धारित १५ दिवसांची मुदत संपूनही आणि क्रीडा विभागाने वारंवार नोटिसा बजावूनही ठेकेदाराने अद्याप ही रक्कम जमा केलेली नाही.

त्यामुळे ठेकेदार मे. साहस चॅरिटेबल ट्रस्टकडून मूळ थकीत रक्कम ४१,१३,५४५ रुपये व त्यावर लागू होणारे व्याज तात्काळ वसूल करून त्यांच्यावर एफआयआर नोंदवून फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ॲड. कृष्ण गुप्ता यांनी पालिकेकडे केली आहे. तसेच मुदत संपल्यावर वसुली न करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जावी व आजपर्यंत ठेकेदाराला बजावण्यात आलेल्या नोटिसा, मिळालेली उत्तरे आणि वसुलीच्या कार्यवाहीचा संपूर्ण अद्ययावत अहवाल सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणीही गुप्ता यांनी पत्राद्वारे केली आहे.

ठेकेदाराला यासंबंधी दोन वेळा नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही याबाबत ठेकेदाराने रक्कम न भरल्यास सदर प्रकरण आयुक्तांच्या निदर्शनास आणून पुढील कारवाई केली जाईल. – दिपाली जोशी, क्रीडा विभाग अधिकारी