भाईंदर :राज्य शासनाच्या रिक्षा चालकांसाठी घेतलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अचानक परिवहन मंत्र्यांच्या मतदारसंघाला भेट दिली. यावेळी त्यांनी शहरातील रिक्षा चालकांशी संवाद साधत सरनाईक यांना निर्णय मागे घेण्याचा इशारा दिला.

१ मेपासून राज्यातील परमिटधारक रिक्षा चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात ‘मराठी विरुद्ध मराठी’ असा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र विरोध दर्शवला असून सरनाईक विरुद्ध सदावर्ते असा शाब्दिक संघर्ष सुरू झाला आहे.

दरम्यान, हा वाद सुरू असतानाच गुरुवारी गुणरत्न सदावर्ते यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघाला भेट दिली. यावेळी त्यांनी विशेषतः रिक्षा चालक संघटनांशी संवाद साधला. सरनाईक यांनी घेतलेला निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप करत त्यांनी तो २८ तारखेपर्यंत मागे घ्यावा, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला. यावेळी शहरातील काही रिक्षा चालक सदावर्ते यांच्या सोबत उपस्थित होते.

आमदार नरेंद्र मेहता यांची भेट :-

मिरा-भाईंदर शहरातील रिक्षा चालकांची भेट घेण्यापूर्वी सदावर्ते यांनी भाजप कार्यालयात जाऊन आमदार नरेंद्र मेहता यांची भेट घेतली. मेहता हे सरनाईक यांचे राजकीय विरोधक मानले जातात. त्यामुळे या भेटीमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, ही कौटुंबिक भेट असल्याचा दावा सदावर्ते यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला.