वसईत पुन्हा गारठा, अवकाळी पावसाने आरोग्यात बिघाड

वसईत शनिवारी धुलीयुक्त पाऊस पडल्याने नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत.

winter-759

विरार : वसईत शनिवारी धुलीयुक्त पाऊस पडल्याने नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. गुजरातमधून आलेल्या धूलिकण घेऊन आलेल्या वाऱ्यामुळे शहरात धुळीची चादर निर्माण झाली होती. त्यात पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पांढरा पाऊस पडल्याच्या चर्चाना उधाण आले होते; पण याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी मिळाली नाही. हवेतील वाढत्या गारव्याने पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याच्या चिंता वाढल्या आहेत. वसई विरारमध्ये अवकाळी पावसाने पुन्हा एकदा वातावरणाची समीकरणे बदलवली आहेत. हवेतील गारवा वाढल्याने वसईत तापमानाचा पारा झपाटय़ाने उतरला. शनिवारी गार वाऱ्यासह १८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. सध्या शहरात साथीच्या तापाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात पुन्हा बदल झाल्याने साथीचे आजार वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

त्याचबरोबर वसईतील हवेच्या गुणवत्तेलासुद्धा याचा मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सध्या शहरातील हवेची गुणवत्ता मध्यम असून त्यातील धुलिकाचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषण गुणवत्ता निर्देशानुसार सध्या १४५ ची नोंद आहे. सदरचे प्रमाण हे मध्यम स्वरूपाचे असल्याने नागरिकांना फुप्फुसाचा त्रास तसेच हृदयविकार, मुले आणि वयस्कर लोकांना श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून हवामानाचा लहरीपणा सुरूच आहे. यामुळे शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे दवाखान्यात रुग्णाच्या रांगा आढळून येत आहेत. डॉ. टिपरे हेल्थकेअरचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर टिपरे यांनी माहिती दिली की, सध्या हवामानातील बदलामुळे साथीचे आजार वाढत आहेत. यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने या रुग्णांची संख्या अधिक वाढत आहे. यामुळे पोषक आहार आणि व्यायाम करावा तसेच लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

शेतीवरही परिणाम

शनिवारी पडलेल्या अवकाळी पावसाचा शेतीवरसुद्धा परिणाम जाणवला आहे. हवेतील गारवा वाढल्याने आंब्याचा मोहर बहरला आहे; पण ढगाळ वातावरण राहिल्यास हा मोहर गळून पडण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्याचबरोबर भाजीपाला घेणाऱ्या शेतकऱ्यांच्यासुद्धा चिंता वाढल्या आहेत. हवामानातील बदलामुळे किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. या पावसाने मच्छीमारांचेसुद्धा नुकसान केले आहे. यामध्ये वसई पाचू बंदर, किल्ला बंदर, विरार अर्नाळा किल्ला बंदर, अर्नाळा गाव या परिसरांतील समुद्रकिनाऱ्यावर वाळविण्यास ठेवण्यात आलेली सुकी मासळी भिजल्यामुळे नुकसान झाले.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hail untimely rains worsen health ysh

Next Story
शहरांतील गुन्हेगारीत वाढ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी