वसई: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रेसिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या सुझुकी हायाबुसा दुचाकीचा भीषण अपघात घडला आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास नायगाव पूर्वेच्या चिंचोटी येथे ही घटना घडली. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुण सुझुकी हायाबुसा दुचाकीवरून मुंबईहून नालासोपाराच्या दिशेने भरधाव जात होते. चिंचोटी परिसरातील साधना हॉटेलजवळ त्यांची भरधाव दुचाकी आली असता, ईश्वर साव (१९) नावाचा युवक रस्ता ओलांडत होता. दुचाकीचा वेग प्रचंड असल्याने चालकाला नियंत्रण मिळवता आले नाही आणि दुचाकीने ईश्वरला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, रस्ता ओलांडणारा ईश्वर साव याचा जागीच मृत्यू झाला. तसेच, दुचाकीवरील चालक शाहरुख फुलजहा खान आणि मागे बसलेला अर्जुन शेट्टी हे दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांचा ही जागीच मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडक बसल्यानंतर दुचाकी बराच अंतर फरफटत गेली होती.
घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. प्राथमिक तपासात ‘अतिवेग’ हेच या अपघाताचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत चालक शाहरुख फुलजहा खान याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने या भागात वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सुझुकी हायाबुसा दुचाकीची का होतेय चर्चा
सुझुकी हायाबुसा ही ‘धूम’ चित्रपटातील आयकॉनिक बाईक म्हणून भारतात प्रसिद्ध आहे. धूम या चित्रपटात बाईक झळकल्यानंतर अनेक तरुणांनी आणि खासकरून रेसिंग क्षेत्रातील तरुणांनी ही बाईक विकत घेतली होती. पण, गेल्या काही काळात मोकळे रस्ते आणि महामार्ग अशा विविध ठिकाणी या भरधाव दुचाकीमुळे अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत.
