वसई: रेल्वेत वाढत्या गर्दीमुळे आता रेल्वे उपनगरीय गाड्या व रेल्वे स्थानकात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे. मागील पाच महिन्यात मीरारोड ते वैतरणा या वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७० गुन्हे घडले आहेत. यात मोबाईल चोरीचे प्रमाण अधिक आहे.
वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीरा रोड ते वैतरणा अशा सात रेल्वे स्थानकांचा समावेश होतो. मागील काही वर्षांपासून या रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा फायदा भुरट्या चोरांनी घेण्यास सुरुवात केली आहे.
मोबाईल चोरी, पाकीट मारी, बॅग लिफ्टिंग, सोनसाखळी चोरी, छेडछाड, मारामारीचे असे विविध प्रकारचे गुन्हे रेल्वे गाड्या व स्थानक परिसरात घडू लागले आहे. यात विशेष करून गर्दीच्या स्थानकात अशा प्रकारच्या घटना अधिक होत आहेत.विशेषतः विरार, नालासोपारा, नायगाव, वसई या स्थानकात सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असते. मागील जून ते मे या पाच महिन्याच्या कालावधी दरम्यान २७० गुन्ह्यांची नोंद वसई रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
प्रामुख्याने यात रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशातून मोबाईल लंपास करण्याच्या घटना अधिकच वाढू लागल्या आहेत.मोठ्या संख्येने प्रवासी हे मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात येत असतात. या घडलेल्या गुन्ह्यांपैकी आतापर्यंत ४५ टक्के गुन्हे उघडकीस आणले आहेत.रेल्वेत घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण हे मागील वर्षांपासून वाढले आहे. ते कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत. प्रवाशांनी सुद्धा काळजीपूर्वक प्रवास करावा किंवा प्रवासा दरम्यान आक्षेपार्ह काही आढळून आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन ही रेल्वे पोलिसांनी केले आहे.
रेल्वे पोलीस स्थानकात गस्त
वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सातही स्थानकात गुन्हेगारी कमी करण्यासाठी गस्त घालणे, अधूनमधून संशयितांची तपासणी, जनजागृती मोहीमा, फटका टोळीवर लक्ष ठेवणे असे उपक्रम राबविले जात आहेत असे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.
सीसीटीव्हीचा फायदा
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढली आहे. पोलिसांकडून रेल्वे स्थानकात गस्त जरी घालत असली तरी अनेक घटनांवर लक्ष जात नाही म्हणून तिसरा डोळा म्हणून स्थानकात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे यात उपयोगी ठरत आहेत.