पाणजू बेटावरील आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळा

२९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वसईतील पाणजू बेटावरील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी उभारण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे.

२९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रश्न मार्गी, लवकरच बांधकामाला सुरुवात

वसई : २९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वसईतील पाणजू बेटावरील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी उभारण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्य़ाच्या आरोग्य विभागाकडून या जागेची पाहणी करण्यात आली असून लवकरच बांधकामाची सुरुवात करून हा प्रश्न मार्गी लागणार आहे.

नायगाव व भाईंदर खाडीपुलाच्या मध्यभागी पाणजू बेट परिसर आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांना बोटीतूनच ये-जा करावी लागत आहे. रात्री अपरात्री आरोग्याच्या निगडित एखादी समस्या निर्माण झाल्यास नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गावातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्या मागणीनुसार  प्रथिमिक आरोग्य केंद्र तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. याबाबत डिसेंबर १९९२ साली प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. परंतु मागील २९ वर्षांपासून हे आरोग्य केंद्र विविध प्रकारच्या कारणामुळे रखडले होते. यामुळे येथील आरोग्य केंद्र हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात चालवावे लागत आहे. या अपुऱ्या जागेतच या आरोग्य सुविधा पुरवाव्या लागत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. याच समस्या लक्षात घेता आरोग्य विभागाकडून  जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती ज्ञानेश्वर सांबरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी सरपंच पाणजू ग्रामपंचायत, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे कार्यकारी आणि कनिष्ठ अभियंता यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहाणी केली आहे. हे काम लवकर पूर्ण करण्यात यावे याबाबत आरोग्य समिती सभापती ज्ञानेश्वर सांबरे यांनीही सूचना केल्या आहेत.

या आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी जिल्हा नियोजन विकास विभागाकडून आरोग्य पथक मुख्य इमारत आणि वैद्यकीय व कर्मचारी निवासस्थान इमारतीसाठी मंजुरी दिली असून लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे. २ एकर जागेत ही इमारत उभारली जाणार असून यासाठी ४.९० ते पाच कोटीचे अंदाजपत्रक तयार करून त्या नुसार आराखडे तयार केले आहेत. त्यानुसार आता लवकरच याचे बांधकाम कसे पूर्ण होईल यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिली आहे.

पाणजू येथील आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी बांधकाम अभियंता यांना घेऊन आराखडा तयार करण्यात येत आहे. लवकरच याचे बांधकाम सुरू करून येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे.

डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी, पालघर

मागील अनेक वर्षांपासून आरोग्य केंद्र तयार व्हावे यासाठी आम्ही  पाठपुरावा करीत आहोत. नुकतीच आरोग्य विभागाने पाहाणी केली असून लवकरच काम पूर्ण केले जाईल, असे सांगितले आहे.

आशिष भोईर, सरपंच, पाणजू ग्रामपंचायत

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Health center panju island ysh

Next Story
धोकादायक इमारतीचा प्रश्न प्रलंबित
ताज्या बातम्या