वसई: वसई-विरारमध्ये उन्हाचा कडाका वाढू लागल्याने मानवाप्रमाणेच आता पशुधनालाही उष्माघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. वातावरणातील या बदलांमुळे जनावरे आजारी पडण्याची शक्यता अधिक असल्याने राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विशेषतः दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर आणि कुक्कुटपालन व्यवसायावर याचा विपरित परिणाम होत असल्याने पशुपालकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वसई-विरारमध्ये फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून तापमानातील सततच्या चढ-उतारामुळे गायी, म्हशी शेळ्या या प्राण्यांसह पक्षांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनावरांच्या शरीरातील पाणी आणि क्षारांचे प्रमाण कमी होऊन निर्जलीकरणाचा धोका निर्माण होऊ शकतो. जनावरांना धाप लागणे, श्वासाचा दर वाढणे, नाकपुड्या कोरड्या पडणे, लाळ गाळणे आणि चारा खाण्यात घट होणे अशी लक्षणे दिसल्यास तो उष्माघात समजावा, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच वसईतील आर्द्र हवामानामुळे जनावरांना अधिक अस्वस्थता जाणवू शकते, ही बाबही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधोरेखित केली आहे. त्यामुळे प्राण्यांना दुपारच्या वेळी विश्रांती देणे, दुभत्या जनावरांना सकाळी लवकर आणि रात्री उशिरा संतुलित आहार देणे, त्यांच्या आहारात क्षार मिश्रण आणि जीवनसत्वांचा वापर वाढवणे, वाढत्या उष्णतेचा परिणाम दूध उत्पादनावर होऊ नये,
यासाठी सायंकाळच्या दूध काढण्याच्या वेळा किमान १ तास उशिराने ठेवणे, सकाळी लवकर आणि संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर त्यांना चरण्यासाठी सोडणे, मुबलक आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, गोठ्यात हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावावेत. शक्य असल्यास गोठ्यावर गवताचे किंवा नारळाच्या झावळ्यांचे आच्छादन करावे. म्हैस वर्गीय जनावरांना स्वच्छ पाण्याच्या हौदात बसण्याची सोय करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
कुक्कुटपालनासाठी विशेष सूचना
फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळा ऋतु सुरु होतो. पक्षांची रोग प्रतिकारकशक्ती उष्ण हवामानामुळे कमी होत असल्याने या काळात डायरिया व राणीखेत, देवी यासारखे जिवाणूजन्य व विषाणूपासून होणारे रोग होऊ शकतात. तसेच पक्षांचे खाणे कमी होऊन उत्पादन क्षमतेत घट होऊ शकते. यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांनी नुकसान टाळण्यासाठी उष्णता परावर्तित करण्यासाठी पक्षीगृहाच्या छतावर पांढऱ्या चुन्याचा लेप लावावा, पक्ष्यांना नेहमी लागणाऱ्या जागेपेक्षा जवळपास २०ते ३० टक्के जागा वाढवून द्यावी,
दुपारच्या वेळी पक्षीगृहातील उष्णता कमी करण्यासाठी ‘फॉगर’ किंवा ‘स्प्रिंकलर’चा वापर करावा, पक्ष्यांना दुपारी १२ ते ४ या वेळेत थंड आणि स्वच्छ पाणी द्यावे. पाण्यात ‘इलेक्ट्रोलाईट्स’ आणि जीवनसत्व ‘क’चा वापर करावा, तसेच त्यांचे लसीकरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. “वसईतील वाढत्या तापमानामुळे पशुधनाला त्रास होण्याची शक्यता अधिक आहे, त्यामुळे पशुपालकांनी प्राण्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. प्राण्यांमध्ये उष्माघाताची कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.”
- डॉ नकुल कोरडे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन ,तालुका पशुवैद्यकीय दवाखाना, वसई
