भाईंदर : घोडबंदर येथील काजूपाडा परिसरात सिमेंट काँक्रीटची वाहतूक करणारा एक अवजड ट्रक अचानक उलटल्याने मंगळवारी दुपारी दोन्ही बाजूंनी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. या घटनेमुळे शेकडो वाहनचालक आणि प्रवासी अनेक तास अडकून पडले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ठाणे मार्गावरील काजूपाडा भागात दुपारी सुमारे दोनच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यावर आडवा पडला आणि संपूर्ण मार्गच बंद झाला. त्यामुळे ठाण्याहून घोडबंदरकडे जाणारी तसेच घोडबंदरहून ठाण्याकडे जाणारी दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली.घटनेनंतर काही वेळातच रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर घराकडे निघालेल्या नोकरदार,रुग्णवाहिका आणि मालवाहू वाहनांनाही या कोंडीचा फटका बसला. काही वाहनचालकांनी वैतागून विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न केला; मात्र रस्ता अरुंद असल्यामुळे तेथेही कोंडी निर्माण झाली आणि परिस्थिती आणखी बिघडली.
जवळपास तीन तास कोणतीही हालचाल न झाल्यामुळे प्रवाशांचा संयम सुटू लागला. काहींनी समाजमाध्यमांवर थेट व्हिडीओ आणि छायाचित्रे टाकून प्रशासनावर टीका केली. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर ट्रक बाजूला करण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली आहे.अखेर तीन तासांनंतर ट्रक बाजूला करून एकेक वाहन सोडण्यात आले.
या अपघातात ट्रकसह रस्त्यालगत उभ्या असलेल्या काही वाहनांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, रस्त्यावर सांडलेले सिमेंट काँक्रीट आणि कचरा साफ करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली
पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
घोडबंदर मार्गावर झालेल्या या अपघातामुळे सायंकाळी वाहतूक पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नोकरदार वर्ग कामावरून सुटल्यावर हा मार्ग पूर्णतः ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असल्यास नागरिकांनी घोडबंदर मार्गाऐवजी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिस व नागरिकांकडून समाजमाध्यमांवर करण्यात येत आहे.

