लोकसत्ता प्रतिनिधी वसई : वसई फाट्याजवळ हायड्रोजन सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रक उलटून अपघात घडला आहे. या अपघातानंतर रात्री तीन वाजल्यापासूनच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या आठ ते दहा किलोमीटर लांब लांबच रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मागील सहा ते सात तास वाहतूक कोंडीत अडकून प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. शनिवारी गुजरात वाहिनीवर हायड्रोजन सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडला आहे. यात संपूर्ण सिलेंडर रस्त्यावर पडल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रात्री तीन वाजल्यापासून मुंबई व गुजरात या दोन्ही वाहिनीवर वाहतूक कोंडी ची समस्या निर्माण झाली आहे सुमारे ८ ते १० किलोमीटर इतक्या लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले आहे. आणखी वाचा-महामार्गावर हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक उलटला, वसई फाट्याजवळ पहाटे झाला अपघात या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना सहा ते सात तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे. या महामार्ग वाहतूक पोलीस व वसई वाहतूक पोलीस यांच्या मार्फत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरांतर्गत रस्त्यावरही कोंडी या वाहतूक कोंडीचा परिणाम हा शहराला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर झाला. सातीवली, वसईफाटा, नायगाव अशा ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. नायगाव पूर्वेच्या बापाणे फाटा येथेही वाहतूक कोंडी झाल्याने नायगाव पोलिसांनी टीवरी फाट्यावरून वाहनांची वाहतूक वळविली होती.