Hitendra Thakur on Operation Lotus: वसई:- वसई विरार महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक गुप्त पद्धतीने व्हायला हवी होती. जर ही निवडणूक गुप्त पद्धतीने झाली असती तर ऑपरेशन शिट्टी काय असतं ते दाखवलं असतं, असा टोला बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला लगावला आहे.
वसई विरार महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली होती. या निवडणूकीत बहुजन विकास आघाडीने ११५ पैकी ७१ जागेवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळविले होते. तर महायुतीने ४४ जागा जिंकल्या होत्या. या महापालिका निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीकडे लागले होते.
तर याच दरम्यान, भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवून बविआचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चर्चांना उधाण आले होते. त्यातच आमची रणनीती काय आहे हे महापौर निवडणूकीच्या दिवशी कळेल असे वक्तव्य भाजप नेते आमदार राजन नाईक यांनी केल्यामुळे सर्वांचे लक्ष भाजपच्या भूमिकेकडे लागून होते.
मंगळवारी वसई विरार शहरात महापौर निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी महापौर पदी बविआचे अजीव पाटील व उपमहापौर पदी बविआचे मार्शल लोपीस यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी बविआचे अध्यक्ष आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी महापालिका सभागृहात दाखल होत अजीव पाटील आणि मार्शल लोपीस यांना शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपला देखील ऑपरेशन लोटसवरून टोला लगावला.
वसई विरार महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक गुप्त पद्धतीने व्हायला हवी होती. जर ही निवडणूक गुप्त पद्धतीने झाली असती तर ऑपरेशन शिट्टी काय असतं ते दाखवलं असतं, असे म्हणत हितेंद्र ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते अजीव पाटील यांची महापौरपदी तर मार्शल लोपीस यांची उपमहापौर पदी निवड झाली आहे. ती झालीच असती. पण ती अधिक मतांनी व्हायला हवी होती. त्यामुळे येत्या काळात ऑपरेशन शिट्टी काय आहे ते सर्वांना कळेल, असेही ठाकूर यावेळी म्हणाले.

