वसई: वसई विरार महापालिका निवडणूक नुकतीच पार पडली आहे. पण, भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांचे सत्र अजूनही सुरूच आहे. महापालिका निवडणुकीच्या काळात एका सभेदरम्यान वसईच्या आमदार आणि भाजप नेत्या स्नेहा दुबे पंडीत यांनी “विधानसभेला कावीळ (पिलीया) दूर केली आहे. त्याचप्रमाणे आता संपूर्ण वसई तालुक्यातील कावीळ (पिलीया) आपल्याला दूर करायचा आहे”, असे विधान केले होते. त्यांच्या याच विधानावर आता बहुजन विकास आघाडीचे नेते आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आमदार स्नेहा दुबे पंडीत यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळावर टीका करत प्रत्युत्तर दिले आहे.
वसई विरार महापालिकेची तिसरी पंचवार्षिक निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरली. या महापालिका निवडणुकीत ११५ पैकी बहुजन विकास आघाडीचे ७०, भाजपचे ४३, काँग्रेसचा १, व शिवसेनेचा (शिंदे गट) १ असे नगरसेवक निवडून आले आहेत. निवडणुक निकालानंतर ३ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुक होणार आहे. या निवडणुकीसाठी ३० जानेवारीला उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती.
तर बहुजन विकास आघाडीकडे यासाठी महापौर पदासाठी ७ आणि उपमहापौर पदासाठी १० इच्छुकांचे अर्ज आल्याची माहिती माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना दिली होती. तर यावेळी बोलताना त्यांनी भाजप नेत्या आणि आमदार स्नेहा दुबे पंडीत यांनी बहुजन विकास आघाडी पक्षाला पिलीया (कावीळ) म्हटल्याच्या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले हितेंद्र ठाकूर?
“आम्ही एकदा तरी भाषणात म्हटलंय का की त्यांना संपवून टाकू? आम्ही आमची कामं दाखवली. रंजना थालेकर सारखी उमेदवार तिला आम्ही सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी दिली आणि ती भरघोस मतांनी निवडून आली. त्या महिलेची कामं लोकांनी बघितली. जात,धर्म नाही बघितला. आम्हीही नाही बघितला. पैसा, जात, धर्म कुठेच ती बसत नव्हती”, अशी प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना दिली.
तसेच भाजप आमदारांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळावर टीका करताना ते म्हणाले की, “आम्ही नगरसेवकांना सल्ले दिले. रिल करा पण नुसते रिलच्या मागे लागू नका कामही करा. खड्ड्यांचं भूमिपूजन करू नका. गटारांचं भूमिपूजन करू नका. मोठं गटार असेल तर नक्की भूमिपूजन करा. ३५ पहिल्यांदाच खड्ड्यांची भूमिपूजनं झाली. पण, भूमिपूजन करूनही खड्डे भरले नाही.”

