वसई: येत्या २ मार्चला होळी तर ३ मार्चला रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे नैसर्गिक रंग, गुलाल, तऱ्हेतऱ्हेच्या पिचकाऱ्या, होळी विशेष कपड्यांनी वसई विरारच्या बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. तर चिमुकल्या ग्राहकांना आकर्षित करण्यातसाठी विविध करण्यासाठी हलक्या, रंगीबेरंगी आणि कार्टून थीमवर आधारित पिचकाऱ्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

रंगांच्या उधळणीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना वसई विरारच्या बाजारपेठांकडे ग्राहकांची पाऊले वळू लागली आहेत. यंदा बाजारात पारंपरिक गुलालासह आधुनिक उपकरणांची चलती दिसत आहे. लहान-मोठ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या क्षमतेच्या पिचकाऱ्या आणि रंग लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तर प्रँक गन, इलेक्ट्रिक वॉटर गन, शॉवर गन, बॅटरीवर चालणाऱ्या पिचकाऱ्या, छोटे छोटे ब्लब असणाऱ्या आणि वेगवगेळे आवाज काढणाऱ्या पिचकाऱ्यांना मुलांकडून विशेष पसंती मिळत आहे. तर ५०० ते १००० रुपयांच्या घरात या पिचकाऱ्यांची किंमत आहे.

लहान मुलांसाठी कार्टूनमधील पात्रांच्या आकर्षक पिचकाऱ्याही दुकानात पाहायला मिळत आहेत. डोरेमॉन, स्पायडरमॅन, छोटा भीम, अव्हेंजर्स आदी पात्रांच्या डिझाईन्सना मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या पिचकाऱ्यांची किंमत ३०० ते १५०० रुपयांच्या घरात आहे. तर पिचकाऱ्यांसह पाण्याच्या फुग्यांची खरेदीही आता केली जात आहे. पूर्वी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या लहान पिशव्यांची जागा आता लहान रबरच्या फुग्यांनी घेतली आहे. पण, पण एक एक फुगा भरण्याऐवजी २७ फुगे एकदाच भरणारे ‘वॉटर बलून कनेक्ट’ विशेष आकर्षण ठरत आहे. ठोक बाजारात हे बंडल २० ते ४० रुपयांत उपलब्ध असून किरकोळ विक्रेत्यांकडूनही रंगपंचमीच्या आधीच त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू झाली आहे.

रंगांच्या बाबतीतही ग्राहकांकडे पर्याय उपलब्ध झाले आहेत. पारंपारिक रंगाबरोबरच ‘मॅजिक कलर’, ‘कलर ब्लास्टर’, ‘कलर स्मॉग’ असे विविध प्रकारचे पर्याय बाजारात उपलब्ध झाले आहेत. तसेच रासायनिक रंगांबाबतची जागरूकता वाढल्याने नैसर्गिक रंगांकडेही ग्राहकांचा ओढा वाढला आहे. यामुळे ‘हर्बल गुलाला’ला ग्राहकांची चांगलीच मागणी आहे. नैसर्गिक फुलांपासून तयार केलेले आणि त्वचेला इजा न करणारे गुलाल ४० रुपयांपासून ते ५०० रुपयांच्या आकर्षक पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. तर साधे रंग ३० ते ४० रुपयांच्या लहान पाकिटात आणि मोठी एक किलोची पाकिटं १५० रुपयांपासून विकली जात आहेत.

फॅन्सी ॲक्सेसरीज आणि पांढऱ्या कपड्यांना मागणी
होळीच्या सणात आणखी रंगत आणण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे मास्क, टोप्या आणि केसांचे टोप (विग) उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे खरेदीदारांकडून वेगवेळ्या आणि भडक रंगांचे, चष्मे, साधू जटा, माळा, टोप्या अशा अनेक फॅन्सी ॲक्सेसरीज विकत घेतल्या जात आहेत. तर दुसरीकडे बाजारातून पांढऱ्या कपड्यांना विशेष पसंती मिळत आहे. पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट, कुर्ते, होळीच्या निमित्ताने विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे दुकानावर अजूनही ग्राहकांची फारशी गर्दी होत नाही. पण, शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्यांच्या दिवशी मात्र मोठ्या प्रमाणावर विक्री होते.