वसई: शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी सुट्टीच्या दिवशी कारवाई करण्यासाठी पालिकेने भरारी पथकाची स्थापना केली आहे. पालिकेने मागील दीड वर्षांत १७ लाख चौरस फुटांहून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहे.

पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी अनधिकृत बांधकामे दिसता क्षणीच जमीनदोस्त करण्याचे आदेश सर्व साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार कारवाई सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील यांच्याकडे अनधिकृत बांधकाम विभागाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारताच मागील दीड वर्षांत १७ लाख चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. ही कारवाई अधिक तीव्र करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

भूमाफियांच्या जागेवर बोजा चढविणार
भूमाफियांची पाळेमुळे समूळ नष्ट करण्यासाठी पालिकेने त्यांची बांधकामे जमीनदोस्त करण्याबरोबर त्यांच्या जागेवर बोजा चढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी योग्य नोटिसा देणे, न्यायालयातील त्यांनी स्थगिती मिळवू नये यासाठी कॅव्हेट दाखल केले जाणार आहे. पालिकेने नुकतीच यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कायदेशीर कारवाईसंदर्भात मार्गदर्शन केले आहे.

भरारी पथकाची स्थापना
पालिकेची सध्या दररोज अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई सुरू आहे. पालिकेला शनिवार आणि रविवारी सुट्टी असते. त्यामुळे कारवाई होत नाही. त्यामुळे चाळमाफिया या संधीचा फायदा घेत दोन दिवसांत चाळी बांधतात आणि त्यात रहिवाशांना राहायला देतात. लोक राहायला आल्यामुळे कारवाई करता येत नाही. त्यामुळे आता पालिकेने शनिवार- रविवार या सुटीच्या दिवशी बांधकामांवर कारवाई करण्याची भरारी पथकाची (फ्लाइंग स्कॉड) स्थापना केली आहे. १० नंतपर्यंत रहिवासी राहत असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई न करम्ण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहेत. मात्र नवीन बांधकामे होत असल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील यांनी दिली.

आयुक्तांच्या आदेशानंतर अनधिकृत बांधकामाविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. शहरात कुठलेही अनधिकृत बांधकाम दिसल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. – आशीष पाटील- अतिरिक्त आयुक्त, वसई विरार महापालिका

अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास अडथळे येऊ नये म्हणून आम्ही कायदेशीर बाबी अधिक सक्षमपणे राबवत आहोत. योग्य नोटीस देणे, कॅव्हेट दाखल करणे आदी प्रक्रिया कारवाईसोबत केल्या जाणार आहेत. – नानासाहेब कामटे, उपायुक्त, वसई विरार महापालिका