वसई: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पार पडणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी विविध निर्बंधही पोलिसांनी लागू केले आहेत.१० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत बारावीच्या तर २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत दहावीच्या लेखी परीक्षा पार पडणार आहेत.
या परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात म्हणून प्रशासनाकडून राज्यभर कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, दक्षता पथके व केंद्रस्तरीय यंत्रणा अधिक सक्रीय करणे, पालक आणि शिक्षकांना शिक्षा सूचीची माहिती देणे, अशा उपाययोजना केल्या जात आहेत.
तर बोर्डाच्या परीक्षांना अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे वसई विरार शहरातही शिक्षण विभागासह पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात गर्दी करण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे. तसेच नियमाचा भंग केल्यास कारवाई केली जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
तर परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार, कॉपी आणि गोंधळ रोखण्यासाठी परीक्षेच्या कालावधीत केंद्राच्या परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स, फॅक्स सेंटर्स आणि एसटीडी बुथ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात आणि परिसरात मोबाईल फोन, स्मार्ट वॉच किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
हे निर्बंध केवळ बाहेरील व्यक्तींसाठी असून परीक्षा प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी, पोलीस पथके, स्वतः परीक्षार्थी आणि अंध-अपंग विद्यार्थ्यांसोबत आलेले त्यांचे एक नातेवाईक यांना केंद्रावर जाण्याची परवानगी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
