वसई :- वसईच्या माणिकपूर परिसरात ३० वर्षांपासून बंद असलेल्या पाण्याच्या टाकीत मानवी मृत शरीराचे अवशेष सापडले आहेत. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार समोर आला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

वसई माणिकपूर परिसरातील नौपाडा येथे बारकुल्या नावाची ३ मजली चाळ आहे. त्या ठिकाणी पाण्याची टाकी तयार करण्यात आली होती. मात्र गेल्या ३० वर्षांपासून ही टाकी वापरात नव्हती. आता या इमारतीच्या डागडुजीचे काम सुरू असताना ही टाकी मजूरांनी तोडली. त्यावेळेस त्यांना कवटी आणि हाडे असे मानवी शरीराचे अवशेष आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती स्थानिकांनी तातडीने माणिकपूर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच शनिवारी रात्री माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

सुरुवातीला केवळ कवटी आणि एकदोन हाडे आढळून आली होती. पोलिसांनी रविवारी दुसऱ्या दिवशी ही सर्च ऑपरेशन राबविले तेव्हा आणखीन काही मृत शरीराचे अवशेष आढळून आले आहेत. याशिवाय सोबत पॅन्ट आणि शर्ट ही सापडला आहे. मानवी शरीराचे अवशेष आढळून आल्याने आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी हत्या आहे की आत्महत्या, किंवा अन्य कोणता प्रकार आहे असे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

पोलिसांच्या तपासाला वेग

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त, माणिकपूर पोलीसांच्या पथकाने घटना स्थळाला भेट दिली. याशिवाय फॉरेन्सिक पथकाला ही पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक पथकाकडून ते अवशेष गोळा करून तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविले जाणार असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या रहस्यमय प्रकरणाचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.