विरार हादरलं! ICICI बँकेवर दरोडा; दरोडेखोरांच्या हल्ल्यात शाखा व्यवस्थापकाचा मृत्यू; कॅशियर जखमी

गुरुवारी संध्याकाळी बँक बंद झाल्यावर सर्व कर्मचारी निघून गेले होते

विरारमध्ये बँकेवर दरोडा पडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रात्री ८ वाजेच्या सुमारास काही जणांनी सशस्त्र हल्ला करीत बँक लुटण्याचा प्रयन्त केला. विरारमधील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेवर हा दरोडा टाकण्यात आला. या हल्ल्यात शाखा व्यवस्थापक महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर कॅशियर महिला जखमी झाली आहे.

विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथे आयसीआयसीआय बँकेची शाखा आहे. गुरुवारी (२९ जुलै) संध्याकाळी बँक बंद झाल्यावर सर्व कर्मचारी निघून गेले होते. त्यावेळी बँकेत रोखपाल श्वेता देवरूख (वय ३२) आणि व्यवस्थापक योगिता वर्तक (वय ३४) या दोघीच होत्या.

रात्री ८ वाजेच्या सुमारास बँकेचा माजी व्यवस्थापक अनिल दुबे बँकेत आला. त्याने चाकूचा धाक दाखवत बँकेतील रोख रक्कम आणि दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघींनी विरोध केला. दुबे याने दोघींवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात व्यवस्थापक योगिता वर्तक यांचा जागीच मृत्यू झाला, तर रोखपाल श्वेता गंभीर जखमी झाल्या. विरार पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन, दोन्ही जखमी महिला कर्मचाऱ्यांना रुग्णालयात हलविले होतं, मात्र यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

आरोपी दुबे याला सोने आणि पैशाची बॅग घेऊन फरार होत असताना नागरिकांनी पकडले. नागरिकांनी मोठं धाडस दाखवत दरोडेखोर व्यक्तीला पकडून ठेवलं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Icici bank robbery manager wife killed and the cashier injured attack akp

फोटो गॅलरी