खासगी वाहनावर बहुरंगी अंबर दिवा लावल्याचा प्रकार माहिती अधिकारात उघडकीस

विरार : वसई-विरार महानगरपालिका पालिकेचे आयुक्त यांनीच नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती समोर आली आहे. आयुक्त वापरत असलेल्या खासगी वाहनावर परवानगी नसताना बहुरंगी अंबर दिवा लावण्यात आला आहे. हा प्रकार माहिती अधिकारात उघडकीस आला आहे. 

 माहिती कार्यकर्ता अनिल कुमार पिल्लई यांनी वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. हे वापरत असलेले वाहन (क्रमांक एम एच ४८ ए डब्ल्यू ६६३५) हे खासगी ठेक्यातील आहे. मात्र आयुक्त ते स्वत:साठी वापरत आहेत. या गाडीत शासनाच्या राजपत्र अधिसूचना १२१४ सन २०१७ च्या नुसार केवळ अग्निशमन दल, पोलीस दल, निमलष्करी दल, आपत्कालीन व्यवस्था या शाखांनाच केवळ बहुरंगी अंबर दिवा वापरण्याची परवानगी आहे. याबाबत महाराष्ट्र शासन परिवहन आयुक्तालय यांनी माहिती अधिकाराला उत्तर देताना सांगितले की आयुक्तांचे वाहन हे खासगी असून मायकल इरोटीयन रोड्रिक्स यांच्या नावाने नोंदणीकृत केंद्र शासन अधिसूचना क्रमांक १२१४ दिनांक १ मे २०१७ नुसार सदर वाहनास बहुरंगी दिवा लावण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे म्हटले आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वसई यांनी या संदर्भात पालिका आयुक्तांना पत्र देऊन या दिवाच्या परवानगीचे कागदपत्र सदर करण्यास सांगितले होते.  पण आजतागयत या संदर्भात पालिकेने कोणतीही कागदपत्रे सदर केली नाहीत. या प्रकरणाचा तपास विरारच्या साहायक पोलीस आयुक्त रेणुका बागडे यांनी पोलीस उपनिरीक्षक हंडाळ यांच्याकडे दिला होता आणि  या संदर्भात पालिका आयुक्त आणि परिवहन विभाग यांना माहिती देण्यासाठी सांगितले होते. पण अजूनही यावर पालिकेने कोणतीही माहिती दिली गेलेली  नाही.

पालिका आयुक्त हे उच्च श्रेणीतील प्रशासकीय अधिकारी आहेत. कायद्याचे पालन करणे अनिवार्य असताना त्यांच्याकडूनच जर कायद्याचे उल्लंघन होणार असेल तर नागरिकांनी काय करावे, असा सवाल अनिल पिल्लई यांनी उपस्थित केला आहे.  या संदर्भात पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

यासंदर्भात आम्ही परिवहन आयुक्त ते पोलीस आयुक्तांपर्यंत  माहितीसाठी प्रवास केला आहे. पण  प्रशासन यावर कारवाई करताना आढळून आलेले नाही. जर शासनाचे नियमच शासकीय अधिकारी तोडत असतील तर सामान्य जनतेने करायचे काय? -अनिल पिल्लई, माहिती कार्यकर्ता, वसई

  या संदर्भात कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही. संबधित पोलीस ठाण्याकडून माहिती विचारली जाईल. त्यानुसार कारवाई केली जाईल – प्रशांत वागुंडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ २

 अशी कोणती तक्रार प्राप्त झाल्याची माहिती सध्या उपलब्ध नाही. संबधित अधिकारी यांना विचारले जाईल, पण अशा कोणत्याही अर्जाची सध्या माहिती नाही. -प्रवीण बागडे, सहायक उपप्रादेशिक अधिकारी, वसई

नियम काय म्हणतो ?  

शासनच्या राजपत्र अधिसूचना १२१४ सन १ मे २०१७ च्या नुसार केवळ अग्निशमन दल, पोलीस दल, निमलष्करी दल, आपत्कालीन यंत्रणा या शाखांनाच केवळ बहुरंगी अंबर दिवा वापरण्याची परवानगी आहे. या शाखांव्यतिरिक्त इतर कोणत्याही शाखेला बहुरंगी अंबर दिवा लावण्याची परवानगी  नाही.