नायगावमध्ये बेकायदा वाहनतळासाठी तिवरांची कत्तल

वसई: नायगाव पश्चिमेतील भागात तिवरांची कत्तल करून बेकायदा वाहनतळ तयार  करण्यात आले आहे. या शासकीय जागेवर अतिक्रमण करून सर्रासपणे वाहने उभी करण्यात येत आहेत. याविरोधात महसूल विभागाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नायगाव पश्चिमेकडील भागात रेल्वे स्थानकाला लागून  शासकीय जमीन आहे. त्या जमिनीवर असलेल्या तिवरांच्या झाडांची कत्तल करून त्याठिकाणी  बेकायदा वाहनतळ उभारण्यात आले आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात कांदळवन नष्ट झाले आहे. सव्‍‌र्हे क्रमांक ११८,  ११९ (ब) , ११९/ अ१, ११९अ/२  ही शासकीय जागा आहे. या शासकीय जागेतील  तिवरांची झाडे तोडून बेकायदा वाहनतळ उभे करण्यात आले असल्याचा आरोप साकाईनगर उमेळा येथील शाखाप्रमुख रोशन कदम यांनी केला आहे. बेकायदा वाहनतळ यावर कारवाई करण्यात यावी यासाठी महसूल विभागाकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.  या जागेवर  वाहने उभी करणाऱ्या नागरिकांकडून पैसे वसूल केले जात आहेत. ही एकप्रकारे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट सुरू केली आहे. या तिवरांच्या झाडांची कत्तल झाली असल्याने पर्यावरणाचा देखील ऱ्हास  झाला असून या भागातील कांदळवनाचा पट्टा हळू हळू नष्ट होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

आंदोलनाचा इशारा

तहसीलदार विभागाकडून तलाठी यांना पाठवून या जागेचा केवळ पंचनामा केला असून अजूनही पुढील कोणतीच कारवाई झाली नसल्याचे रोशन कदम यांनी सांगितले आहे.   या विषयात संबंधित विभाग यांनी कारवाई करुन या माफियांविरोधात गुन्हा दाखल करून ही वसुली थांबवली नाही तर तर या विरोधात आंदोलन केले जाईल असा इशारा कदम यांनी दिला आहे.