विरार : सध्या शहरातील तापमान वाढत असल्याने नागरिक शीतपेयाच्या ऐवजी ताक, दही, लस्सी, श्रीखंड याचे सेवन करणे पसंत करतात. यामुळे या वस्तूंना उन्हाळय़ात मोठी मागणी असते. याच मागणीचा फायदा घेत अनेक व्यापारी बेकायदेशीरपणे पॅकेजिंग करून विकत आहेत. यावर कोणत्याही कंपनीचे नाव, गाव, उत्पादन दिनांक आणि मुदत लिहिलेली नसते. यामुळे हे पदार्थ नागरिकांच्या आरोग्यास हानीकारक ठरू शकतात.
सध्या वसई विरारमध्ये उन्हाचे चटके जाणवत आहेत. तापमानाचा पारा दरवर्षीपेक्षा अधिक आहे. ३६ ते ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यात उन्हाचा दाह वाढत असल्याने नागरिक पारंपरिक शरीराला थंडावा देणाऱ्या वस्तू खरेदी करत आहेत. यात प्रामुख्याने ताक, दही आणि लस्सी याचा वापर वाढला आहे. यामुळे अनेक शीतपेयाच्या दुकानात, दूध डेअरीमध्ये हे पदार्थ विक्रीसाठी ठेवले जात आहेत. त्यात स्थानिक वस्तू अथवा स्वत:चे उत्पादन म्हणून डेअरीवाले ताक, दही, लस्सी यांचे पॅकेजिंग करून दाम वाढवून विकत आहेत. पॅकेजिंग असल्याने ग्राहकांचासुद्धा त्यावर विश्वास बसत असल्याने त्याची मागणी वाढली आहे. नियमित खुले ताक आणि लस्सी १० ते १२ रुपये ग्लास विकला जातो, तर तेच पॅकेजिंग करून २० ते २५ रुपयाला विकले जाते. यामुळे व्यापाऱ्यांना अधिक नफा मिळत आहे. पण हे पॅकेजिंग केलेले पदार्थ त्यावर त्याची उत्पादक कंपनी, त्याचा पत्ता, उत्पादन दिनांक आणि मुदत छापणे आवश्य आहे. यामुळे ग्राहकांना पदार्थाची गुणवत्ता, त्यात वापरलेल्या वस्तू आणि तिची वापराची मुदत कळते. पण व्यापारी केवळ नफ्यासाठी सर्व नियमांना बगल देऊन बेकायदेशीरपणे या वस्तूंची विक्री करत आहेत. सदरचे पदार्थ वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर परिसरात मोठय़ा प्रमाणात विकले जात आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
यासंदर्भात माहिती देताना अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त दिगंबर भोगावदे यांनी माहिती दिली की, पॅकेजिंग केलेल्या सर्व पदार्थावर अन्न व औषध प्रशासनाने घालून दिलेल्या नियामनुसार सर्व माहिती छापील असावी. असे न केल्यास त्या पदार्थावर आणि उत्पादकावर कारवाई केली जाईल. तरी नागरिकांनी तपसणी करूनच अशा वस्तूंची खरेदी करावी. अन्यथा स्थानिक अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, अशा तक्रारीवर तातडीने कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.