वसई: लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ांमध्ये खासगी विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थ आणि शीतपेये विकण्यास मनाई असताना त्याची सर्रास विक्री होत आहे. विशेष म्हणजे बंदी असलेल्या गुटखा तसेच सिगारेटही चोरून विकली जात आहे. वसई रोड रेल्वे स्थानकात गाडय़ा आल्यावर त्यात विक्रेत्यांकडून हे पदार्थ ट्रेनमध्ये आणले जात असल्याचे उघड झाले आहे.
वसई रोड रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकाला जंक्शनचा दर्जा निर्माण झाल्यामुळे दिल्ली, गुजरात, राजस्थान, केरळ अशा विविध राज्यांत जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा वसई रोड रेल्वे स्थानकात थांबत असतात. याच स्थानकात अनेक बेकायदा व्यवहार होत असल्याचा आरोप स्थानिक सामजिक कार्यकर्ते राज दसोनी यांनी केला आहे. स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडय़ा थांबल्यानंतर विक्रेते या गाडय़ांमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ, शीतपेये, पाणी पुरवतात. तसेच सिगारेट आणि गुटखादेखील गाडय़ांमध्ये विक्रीसाठी आणत असतात. लांब पल्ल्याच्या गाडय़ा जिथे उभ्या राहतात तिथे भिंत आहे. या सुरक्षा भिंतीची उंची कमी असल्याने या भिंतीवरून हे खासगी विक्रेते गाडय़ांमध्ये पदार्थ आणत असतात. या भिंतीच्या पल्याड मोठय़ा प्रमाणात फेरीवाल्यांनी केवळ रेल्वेत खाद्यपदार्थ विकण्यासाठी खाद्यपदार्थाच्या गाडय़ा थाटल्या आहेत. विशेष म्हणजे रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमतानेच हा प्रकार सुरू असतो. विक्री केलेल्या पदार्थाचा कचरा स्थानकात साचला जात असून दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
पोलीस आयुक्तांकडे तक्रार
नियमांची पायमल्ली होत असल्याबद्दल माजी नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त सदानंद दाते यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या परिसरात एक ठेकेदार बेकायदेशीरपणे रेल्वेत खाद्यपदार्थाच्या आडून गुटखा आणि अन्य विघातक पदार्थाची विक्री करत असतो, असाही आरोपी चेंदवणकर यांनी या तक्रारीत केला आहे.
नियम काय सांगतो?
रेल्वेच्या नियमानुसार रेल्वे गाडय़ांमध्ये केवळ आयआरसीटीसीने प्रमाणित केलेलेच खाद्यपदार्थ विकता येतात. याशिवाय फक्त रेल्वे स्थानकातील अधिकृत खाद्यपदार्थ स्टॉलधारकांनाच रेल्वेत खाद्यपदार्थाची विक्री करता येते. बाहेरील खासगी विक्रेत्यांकडील निकृष्ट खाद्यपदार्थ, निकृष्ट बाटलीबंद पाणी आणि शीतपेयांमुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.


या संदर्भात माहिती मिळाली असून, पथकाच्या सहायाने पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, तसेच रेल्वेतसुद्धा तपासणी केली जाईल.’’ -सुमित कुमार ठाकूर, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे