भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील उत्तन परिसरात मोठय़ा प्रमाणात माती भराव टाकण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे  भराव करणाऱ्या वाहनावरच पालिकेचे स्टिकर लागलेले असल्यामुळे  प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

 उत्तन परिसर   समुद्रकिनाऱ्यालगत असल्यामुळे या ठिकाणी प्रामुख्याने मासेमारी वर्ग वास्तव्य करतात. याशिवाय या भागात घनदाट जंगल आणि शेतीची जमीन असल्यामुळे अद्याप या ठिकाणाला गावाचे स्वरूप आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून उत्तन परिसराचे नैसर्गिक महत्त्व नष्ट होत असल्याचे समोर येत आहे.  प्रामुख्याने या ठिकाणी वाढत असलेली अनधिकृत बांधकामे आणि माती भराव जबाबदार आहे.  याला आळा घालण्याकरिता शासनाकडून तसेच पालिका आणि तहसीलदार विभागाकडून कठोर नियम तयार करण्यात आले आहेत. मात्र या नियमांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे समस्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. सध्या उत्तन येथील धारावी देवी मार्गावर मोठय़ा प्रमाणात रस्त्याच्या कडेला माती भराव करण्यात येत आहे. यात इमारतीचे रॅबिट, खोदकामातील माती आणि गटारातील सुका गाळ टाकला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे धारावी देवी मार्गावर वाहनांची लगबग अत्यंत कमी प्रमाणात होत असते. त्यामुळे येथील शांत वातावरणाचा गैरफायदा उचलत माती भराव करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. माती भराव करण्यास येणाऱ्या वाहनावर ‘मीरा-भाईंदर महानगरपालिका ऑन डय़ुटी’ असे स्टिकर लावलेले असल्यामुळे काही विरोध करण्यासदेखील भीती वाटत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

‘त्या ठिकाणाची तात्काळ पाहणी करण्यात येणार आहे. शिवाय वाहनाची माहिती घेऊन माती भराव करणाऱ्यांची माहिती तहसीलदारांना देऊन गुन्हा दाखल करण्यात येईल.’

 प्रभाकर म्हात्रे, प्रभाग अधिकारी (प्रभाग १)