वसई: वसई विरार शहरात बेकायदेशीर मातीभराव करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे प्रकार लोकसत्ताने समोर आणल्या नंतर आता प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशा प्रकारे होणारा माती भराव हा एक प्रकारे पुन्हा वसई बुडवायची पूर्व तयारी असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मागील काही वर्षांपासून वसई विरार शहर हे झपाट्याने विकसित होत असून विविध ठिकाणी विकासकामे जोरात सुरू झाली आहेत. अनेक भागात माती भराव करून जागा सपाटीकरण करवून घेतल्या जात आहेत. माती भराव करताना महसूल विभागाकडून परवानगी (रॉयल्टी ) काढावी लागते.  त्यातून महसूल विभागाला महसूल मिळतो. मात्र आता माती भराव करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच सर्रास पणे माती भराव करू लागले आहेत त्यामुळे अनेक भागातील पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग ही बंद होऊ लागले आहेत. काही ठिकाणी कांदळवन असलेल्या भागातही माती भराव करून ती नष्ट केली जात आहेत.

नुकताच वसई पूर्वेच्या कामण देवदल येथील नैसर्गिक नाल्यात माती भराव टाकून ३० फुटांचा नाला चार फुटांवर आणला असल्याचा प्रकार घडला आहे. तर दुसरीकडे नायगाव पूर्वेच्या भागात तलाठी कार्यालयाच्या समोरील जलाशय नकाशावरून गायब करीत त्या ठिकाणी बेसुमार माती भराव करण्यात आला आहे.

असे बेकायदेशीर माती भराव करण्याचे प्रकार विविध ठिकाणी सुरूच असल्याने नैसर्गिक पाणी जाण्याचे मार्ग बंद होतील यामुळे आणखीन मोठी समस्या निर्माण होईल अशी चिंता येथील नागरिकांमधून वर्तवली जात आहे. पर्यावरणाच्या समतोलासाठी  तळी, बावखळे, पाणी वाहून नेणारे नैसर्गिक मार्ग महत्वाचे ठरतात. याचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. असे असताना त्यावर प्रशासन कोणतीच कारवाई करीत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आता माती भराव हा मोठ्या प्रमाणात फोफावू लागला आहे. त्यामुळे पाणी साठवणूक व जाण्याचे मार्ग बंद होत आहेत. त्यामुळे  वसई बुडवायची पूर्व तयारी सुरू असल्याचे  सामाजिक कार्यकर्ते मनवेल तुस्कानो यांनी सांगितले आहे.

शेती क्षेत्र नष्ट ?

शहरात विविध ठिकाणी होत असलेल्या बेकायदेशीर मातीभराव यामुळे वसईतील शेतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली आहे. जी पण विकास कामे होत आहेत त्यांचे कोणतेच नियोजन दिसून येत नाही.

मागील काही वर्षांपूर्वी १९८२ झाली विरारच्या कोफराड भागात माती भराव झाला आणि हजारो एकर शेती नष्ट होऊन त्यावर अकराची झाडे उगवली आहेत असे मनवेल तुस्कानो यांनी सांगितले आहे.

कारवाई केली जात असल्याचा दावा

बेकायदेशीर माती भराव व कांदळवन कत्तल याबाबत महसुल विभागाकडून कारवाई केला जात असल्याचा दावा महसूल विभागाने केला आहे. नैसर्गिक मार्ग बंद करीत आहेत त्यांच्यावर गुन्हे ही दाखल केले आहेत. याशिवाय ज्यांनी कांदळवन नष्ट केले आहे अशा २३ प्रकरणे गुन्हे दाखल करण्यासाठी दिली असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.