वाडकर दाम्पत्याकडून महत्त्वाचे पुरावे गायब

वसई-विरार शहराच्या आरोग्य क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या वाडकर दाम्पत्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दंतचिकित्सक आरती वाडकरकडून गर्भपात केंद्र

सुहास बिऱ्हाडे

वसई : वसई-विरार शहराच्या आरोग्य क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या वाडकर दाम्पत्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ. आरती वाडकर ही दंतचिकित्सक असताना अनधिकृत खासगी रुग्णालयात गर्भपात केंद्र चालवत असल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, विरार पोलिसांनी तपासात केलेल्या हलगर्जीपणामुळे या दाम्पत्याने रुग्णालयातून सर्व महत्त्वाचे दस्तावेज, सीसीटीव्ही चित्रण गायब करण्यात यश मिळवले आहे. वाडकर हा  शहरात १४ वर्षांपासून  डॉक्टर म्हणून वावरत होता. पत्नीच्या साथीने त्याने अनधिकृत रुग्णालय सुरू केले होते. त्याचे िबग फुटल्यानंतर गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती. मात्र पोलिसांनी आणि  महापालिकेने पुढील गुन्हा दाखल करण्यात उशीर केल्याने पहिल्या गुन्ह्यातून जामीन मिळताच सुनील वाडकर आणि त्याची पत्नी फरार झाले आहेत.

आरती वाडकर हिच्याविरोधात महापालिकेची फसवणूक करणे, तसेच चोरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.   आरती वाडकर दंतचिकित्सक असताना हायवे रुग्णालयात गर्भपात केंद्र चालवत होती. त्यासाठी तिने ठाणे जिल्हा रुग्णालयातून गर्भपात केंद्राच्या मान्यतेचे प्रमाणपत्र मिळवले होते. याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी सांगितले की, दंतचिकित्सक असताना आरती वाडकर गर्भपात केंद्र चालवत असल्याने संशय निर्माण झाला आहे. तिने केलेल्या गर्भपातांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्या ठाणे जिल्हा रुग्णालयातून तिने गर्भपाताचे प्रमाणपत्र मिळवले तेथून या प्रमाणपत्राची सत्यतादेखील पडताळून पाहणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

पोलिसांची दिरंगाई

‘हायवे’ रुग्णालयातून सुनील वाडकरला अटक केल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयातील रजिस्टर, संगणक तसेच इतर साहित्य जप्त करणे आवश्यक होते. मात्र पोलिसांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याने सर्व साहित्य आरोपींनी गायब केले आहे. आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरा होता. मात्र त्याच्या डीव्हीआरमध्ये हार्डडिस्क नव्हती. रुग्णालयातील रजिस्टर गायब असल्याने त्याने किती रुग्णांवर आणि कोणते उपचार केले त्याची माहिती मिळू शकलेली नाही. याचा फायदा आरोपीला न्यायालयात होण्याची शक्यता आहे.

न्यायालयाने प्रतिज्ञापत्र मागवले

वाडकर दाम्पत्य फरार असून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. पोलिसांनी वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. त्याला आरोपींच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता. त्यावर न्यायालयाने पोलिसांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. वाडकरकडे वैद्यकीय पदवी आणि नोंदणी प्रमाणपत्र नाही, रुग्णालयातील कर्मचारी बोगस आहेत, रुग्णालयाचा डॉक्टर पांडे बोगस असून तो फरार आहे आदी बाबतीत ९ फेब्रुवारीच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Important evidence missing couple ysh

Next Story
अनधिकृत बांधकामांना अभय देण्यासाठी रुग्णालयाचा घाट
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी