वसई: प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी वसई स्थानकात उन्नत डेक उभारण्यात आला आहे. पण, पानाच्या पिचकाऱ्या, साचलेला कचरा आणि गर्दुल्यांचे अतिक्रमण यामुळे अवघ्या एका महिन्यातच या डेकची दुरावस्था झाली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांपैकी वसई रेल्वे स्थानक हे अत्यंत गजबजलेले आणि गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. दररोज हजारो प्रवासी या रेल्वे स्थानकातून मुंबई, विरार आणि पालघरच्या दिशेने प्रवास करतात. पण, वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकातून ये-जा करणेही कठीण होऊन बसले होते.

त्यामुळे या गर्दीचे विभाजन करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ अ (एमयूटीपी-३ अ) अंतर्गत वसई रेल्वे स्थानक पूर्व येथील फलाट क्रमांक ४/५ आणि ६/७ ला जोडण्यासाठी ६ मीटर रुंदीचा एक नवीन पादचारी पूल बांधण्यात आला आहे. या पादचारी पुलावर दोन सरकते जिने आणि दोन जिने उभारण्यात आले आहेत. तसेच ६० मीटर रुंद आणि १० मीटर उंचीचा उन्नत डेकही महिनाभरापूर्वी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला होता.

पण, या डेकच्या स्वच्छता आणि देखभालीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे अवघ्या महिनाभरातच डेकची दुरावस्था झाली आहे. डेक आणि फलाटाला जोडणाऱ्या जिन्याच्या कडेला तसेच फलाटावर विविध ठिकाणी कचरा साचल्याचे दिसून येत आहे. तर काही प्रवाशांनी डेकची काच आणि रेलिंगवर पानाच्या पिचकाऱ्या मारल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी खुल्या करण्यात आलेल्या या डेककडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची तक्रार प्रवासी करत आहेत.

गर्दुल्ल्यांचेही डेकवर अतिक्रमण

वसई स्थानकातील जिने, तिकीट घर, फलाट तसेच रेल्वे स्थानकाच्या आवारात गर्दुल्ल्यांनी ठाण मांडल्यामुळे प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असे असताना आता नव्याने खुला करण्यात आलेल्या उन्नत डेकवरही गर्दुल्ल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. त्यामुळे रात्री- अपरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आणि खासकरून महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.