सुहास बिऱ्हाडे

गेल्या काही दिवसांत वसई-विरार शहर गोळीबारांच्या आवाजाने दणाणून गेले आहे. एकाच आठवडय़ात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या. यामध्ये एकाची हत्या झाली तर दोन जण थोडक्यात बचावले. तिन्ही घटना वेगवेगळय़ा असल्या तरी वादातून पिस्तूल काढून गोळीबार होणे हे गंभीर आहे. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वसई-विरार शहराची वाटचाल उत्तर प्रदेश-बिहारच्या दिशेने जातेय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
fire workers huts at Mira road
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

एकाच आठवडय़ात गोळीबाराच्या झालेल्या तीन घटनांनी वसई-विरार शहर हादरले आहे. दोन घटना या वैयक्तिक वादातून झाल्या होत्या आणि त्यातील आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. परंतु विरारमधील समय चौहान या गुन्हेगार प्रवृत्तीच्या तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी केलेली हत्या पोलिसांपुढे आव्हान बनली आहे. १५ दिवस उलटूनही पोलिसांना त्याचा छडा लावता आलेला नाही. संपूर्ण गुन्हे शाखा या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी हात धुऊन मागे लागली आहे. या प्रकरणातील आरोपींना, सूत्रधाराला पोलीस आज ना उद्या पकडतील. पण मुद्दा हा आहे की अशा गोळीबाराच्या घटना वसई विरार शहरात का घडू लागल्या आहेत? हत्यारे कुठून आणली जातात? कोण आहे याच्या मागेत? सुसंस्कृत वसई नगरी गुन्हेगारांची कर्मभूमी का बनू लागली आहे.

या सर्व प्रश्नांच्या मुळाशी गेलो तर एकच उत्तर समोर येते ते म्हणजे या परिसरात होणारी बेसुमार अनधिकृत बांधकामे आणि त्यात राहायला येणारे परराज्यातील लोक. उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतून दररोज हजारोंच्या संख्येने परप्रांतीय लोक वसई-विरार शहरात राहायला येत आहेत. या सर्वसामान्य लोकांबरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा देखील भरणा होऊ लागला आहे. वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव या चार शहरांच्या पूर्वेला असेलली मोकळी शासकीय जागा, वनजमिनी, आरक्षित जागा हडप करून, भराव करून येथे बेकायेदशीर चाळीच्या चाळी उभ्या राहात आहे. या अनधिकृत बांधकामातून कोटय़वधींची कमाई होत असल्याने अधिकाऱ्यांपासून नेत्यांपर्यंत सारेच गप्प असतात. अगदी शासनातील मंत्र्यांपर्यंत हा मलिदा नियमित मिळत असल्याने या बांधकामांवर कारवाई होत नाही. या अनधिकृत बांधकामांमुळे नागरी सोयीसुविधांवर ताण येत असतो. त्यामुळे शहराचे नियोजन बिघडत आहे. पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आदी समस्या आहेतच, पण त्याचबरोबर वाढती गुन्हेगारी ही या अनधिकृत बांधकामामुळे निर्माण झालेली मोठी समस्या आहे.

भारतीय दंडविधान संहितेमध्ये जेवढी कलमे आहेत त्या सर्व कलमाअंतर्गत गुन्हे शहातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये विशेषत: नालासोपारा, विरार, वालीव पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होत आहेत. देशभरात जे गुन्हे होतात ते करणारे गुन्हेगार नालासोपारामध्ये आश्रयाला असतात. त्यामुळे देशभरातील विविध राज्यातील पोलीस, गुप्तचर यंत्रणा, दहशतवादी पथके दररोज नालासोपारा, वसई-विरार शहरात येत असतात. जवळच्या मुंबई, ठाण्यात घडणाऱ्या गुन्ह्यांमधील आरोपी या नालासोपारा शहरात निघतात. या शहरातील अनधिकृत वसाहतींमध्ये सर्व प्रकारचे गुन्हेगार रहात आहेत. अनधिकृत बांधकामांने आपल्या दैनंदिन आयुष्यावर काही फरक पडत नाही असे वसई-विरारमधील इतर नागरिकांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. या नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधांवर तर या परराज्यातील लोकसंख्येमुळे डल्ला मारला जात आहेच. पण गुन्हेगार अगदी त्यांच्या दाराशी आलेला आहे. रिक्षात बसताना रिक्षाचालकाशी वाद झाला, भाजी घेताना भाजीवाल्याशी वाद झाला तर तो कुठल्या क्षणी चाकू काढून हल्ला करेल याचा नेम नाही. कारण इतर राज्यातून आलेली गुन्हेगार मंडळी शहरात वावरत आहे. रस्त्यात चालताना धक्का लागला तरी हल्ला होण्याच्या घटना घडत आहेत.

वसई-विरार सर्वात सोपा मार्ग

उत्तर प्रदेश, बिहार आदी मागास राज्यातील लोकांना उपजीविकेचा सोप्पा मार्ग म्हणजे वसई विरार. उत्तर प्रदेश राज्य जर देश असता तर जगात सहाव्या क्रमांकाचा देश ठरला असता एवढी अवाढव्य लोकसंख्या आहे. ते राज्य मागास असल्याने बेरोजगारांची संख्या भरपूर. तो सर्व लोंढा वसई विरारच्या आश्रयाला येत आहे. इथे स्वस्तात अनधिकृत वसाहतीत रहायाल मिळतं आणि रोजगारासाठी रिक्षासारखा पर्याय असतो. राज्य शासनाने रिक्षा परमिट खुले केल्याने तर त्यांच्यासाठी सुवर्णसंधीच होती. वसई विरारमध्ये हजारोंच्या संख्येने अनधिकृत रिक्षा आहेत. ते चालवणारे या उत्तरेकडील राज्यातून आलेले लोक आहे. त्यातही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांची संख्या जास्त आहे. या रिक्षाचालकांचा पूर्वेतिहास तपासला तरी त्यांच्यी गुन्हेगारी पार्श्वभूमी उघडकीस येईल. पोलिसांनीच दिलेल्या माहितीनुसार टाळेबंदीच्या काळात पोलिसांनी १ लाख लोकांना उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पाठवले. मात्र काही दिवसातच हे एक लाख परत आलेच, शिवाय येताना सोबत आणखी १ लाख लोकांना घेऊन आले. 

घरफोडी, वाहनचोरी, सोनसाखली, चोऱ्या आदी सर्व घटनामंध्ये या परराज्यांतील लोकांचा समावेश आहे. गोळीबाराच्या घटनेतील सर्व हल्लेखोर हे परराज्यातील आहेत. यावरूनच त्याची कल्पना यावी. त्यामुळे सर्रास गावठी कट्टे शहरतील या वस्त्यांमध्ये दिसू लागले आहे. या अनधिकृत वसाहती माफिया गुंडांच्या वसाहती बनल्या आहेत. त्यात त्यांची एवढी दहशत दिवसेंदिवस वाढू लागली आहे की आता पोलिसांना कोम्बिंग ऑपरेशन करणे देखील जड जाऊ लागले आहे. पोलीस आयुक्तालयाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे.

 पोलीस आयुक्तालयाचे गुन्ह्यांची उकल करण्याचे काम जरी चांगले असले तरी परराज्यातील हा माफियाराज मोडून काढण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांची यादी काढून त्यांना तडीपार कढणे, त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची गरज आहे. गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याबरोबर वसई विरारमधील ही वाढती गुन्हेगारी समूळ नष्ट करायची असेल तर या अनधिकृत बांधकामांवर आळा घालणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस आणि पालिकेला एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.