भाईंदर :- उत्तन येथे उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे १४ निर्माणाधीन बंगले जमीनदोस्त करण्यात आले आहेत.
भाईंदरच्या पश्चिम भागातील उत्तन परिसर दाट जंगल आणि जवळच समुद्रकिनारा असल्यामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरतो. येथील निसर्गरम्य वातावरणामुळे अनेकांना येथे स्वतःचे घर बांधण्याची इच्छा होते. याच गोष्टीचा गैरफायदा घेत काही भू-माफियांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे उभारली आहेत.
नुकतीच येथील येडू कंपाउंड परिसरात अनधिकृत बंगले उभारले जात असल्याची तक्रार आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी प्रभाग क्रमांक १ येथील प्रभाग अधिकारी व अतिक्रमण विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली.या कारवाईत ३ पूर्ण तयार बंगले व ११ निर्माणाधीन बंगले जमीनदोस्त करण्यात आले. तसेच, या अनधिकृत बांधकामांमागील संबंधितांवर एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.