वसई: रुग्णालयात असलेल्या आपल्या आजारी आईला भेटून घरी परतणाऱ्या एका महिलेचा टेम्पोने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे. मेलबा मायकल बेन्स ( ४०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. नायगाव पश्चिमेच्या उमेळा फाटा येथे शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. टेम्पोचालक मद्याच्या नशेत असल्याने त्याचे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मेलबा बेन्स या नायगाव पूर्वेच्या सिटीझन बेझी इमारतीत राहत होत्या. त्यांची आई वसईच्या बंगली येथील कार्डीनल रुग्णालयात उपचार घेत आहे. शुक्रवारी सकाळी मेलबा या रुग्णालयात असलेल्या आईला भेटण्यासाठी जात होत्या. सकाळी साडेनऊ च्या सुमारास नायगाव पश्चिम उमेळा फाटा रस्त्यावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने त्यांना धडक दिली. यात मेलबा गंभीर जखमी झाली होत्या. त्यांना स्थानिकांनी कार्डिनल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हेही वाचा : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही पालघर जिल्ह्यातील आदिवासींचा मूलभूत हक्कांसाठी संघर्ष सुरूच नागरिकांनी टेम्पो चालक श्याम बांबू पांडे (५०) याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याने मद्यपान केल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्याच्याविरोधात कलम १०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजू माने यांनी दिली आहे.आरोपीला शनिवारी वसई सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. हेही वाचा : वसईत १२ ऐवजी ७ उड्डाणपूल होणार, सर्वेक्षणानंतर रचनेत बदल, ३ पूल एकमेकांना जोडणार यापूर्वी विरार येथे मद्याच्या नशेत भरधाव वेगाने जाणार्या फॉर्च्युनर गाडीने धडक दिल्याने विवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आत्मजा कासाट यांचा मृत्यू झाला होता. वाहन चालकांच्या बेदरकारपणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अपघातात जीव जात असल्यामुळे वसई संताप व्यक्त होत आहे