वसई: भाजप कार्यकर्त्याला मारहाण करूनही त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्याने वसईतील भाजप कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. मारहाण करणाऱ्याचे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांच्या उंबरठे झिजवूनही काहीच फायदा झालेला नाही. केंद्रात आणि राज्यात सत्ता असतांनाही वसईत आम्ही काही करू शकत नाही, असे भाजप कार्यकर्ते हताशपणे बोलू लागले आहेत.

भाजपचे कार्यकर्ते प्रतीक चौधरी यांच्यावर बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी स्वप्नील नर यांनी भर रस्त्यात आढळून मारहाण केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला तरी लगेचच जामिनावर सुटले. त्यामुळे स्वनिल नर यांच्या अनधिकृत टपऱ्यावर कारवाई करा म्हणून भाजपने पालिकेला पत्र दिले. परंतु कारवाई झाली नाही. गुरुवारी मग भाजपचे सर्व वरीष्ठ नेते पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांना भेटले. जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, नालासोपारा विधानसभा संघटक मनोज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट माजी नगरसेवक किरण भोईर, ऍडव्होकेट राहुल सिंग अशा दिग्गज नेत्यांचा त्यात समावेश होता. मात्र आयुक्तांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने हे नेते निराश झाले होते. ‘केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये आमची सत्ता आहे… आमचेच गृहमंत्री केंद्रात आणि राज्यात आहे तरी बहुजन विकास आघाडीच्या गुंडांकडून आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण होते आणि आम्ही काहीच करू शकत नाही, आम्हाला कोणी विचारत नाही अशी खंत माजी नगरसेवक किरण भोईर यांनी व्यक्त केली. पालिका प्रशासन बहुजन विकास आघाडीच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप भाजपाचे वसई विधानसभा संघटक मनोज पाटील यांनी केला.

हेही वाचा : खासगी रुग्णालयांना दिलासा, महात्मा फुले जनआरोग्य योजनतील शस्त्रक्रियांच्या दरात वाढ

काहीच कारवाई होत नसल्याने शेवटी शुक्रवारी दुपारी भाजप कार्यकर्त्यांनी बाभोळा नाका येथे आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी चांगली घोषणाबाजी केली परंतु रस्ता अडवून आंदोलन केल्याने नागरिक चांगलेच भडकले होते. मारहाण त्यांनी केली मग रस्ता अडवून आम्हाला का त्रास देता? असा सवाल नागरिकांनी केला. यामुळे भाजपाची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.