वसई: महावीर जयंती निमित्त रविवारी चिकन-मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या पालिकेच्या निर्णयाचा फज्जा उडाला. बंदी झुगारून दुकाने सुरू होती आणि नागरिकांनी देखील नेहमीप्रमाणे खरेदीसाठी गर्दी केली होती.

महावीर जयंती निमित्त रविवार २१ एप्रिल रोजी शहरातील चिकन मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश वसई विरार महापालिकेने गुरूवारी काढले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. विविध सामाजिक संघटनांनी या बंदीला विरोध केला होता तर खाटीक संघटनांनी बंदी न जुमानता दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. भूमीपुत्र संघटना, खाटीक संघटनांनी तर उघड पणे या निर्णयाविरोधाक दंड थोपटले होते. त्यामुळे रविवारी नेहमीप्रमाणे बाजारात चिकन- मटणची दुकाने सुरू होती आणि नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे या बंदीचा वसई विरारमध्ये काहीच परिणाम दिसून आला नाही. बंदी घालण्याच्या निर्णय चुकीचा असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

हेही वाचा : नागरिकांना अंधारात ठेवल्याची महापालिकेची कबुली, रविवारच्या मांसाहार बंदीमुळे मिरा भाईंदरमध्ये संताप

लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पालिकेने सुरू असलेल्या दुकानांवर कारवाई करण्याचे टाळले. आम्ही पोलीस उपायुक्तांना या निर्णयाची माहिती देऊन कारवाईचे निर्देश दिले होते, अशी माहिती पालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त (आरोग्य) सुखदेव दरवेशी यांनी दिले.