वसई: मंगळवारी संध्याकाळी वसई येथील दिवाणमान परिसरात विषारी वायूची गळती झाली होती. या घटनेत एकूण १९ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर त्यापैकी एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

वसई पश्चिमेकडे दिवाणमान परिसर आहे. या भागात महापालिकेच्या पाण्याची टाकी आहे. या पाण्याच्या टाकीतून आसपासच्या परिसरात पाणीपुरवठा केला जातो. पण, गेल्या काही दिवसांपासून या टाकीचा व्हॉल्व बिघडल्यामुळे पाण्याची गळती सुरू होती. तर हे पाणी रस्त्यावर साचून नागरिकांना ये-जा करण्यास त्रास होत होता. त्यामुळे नागरिकांनी केलेल्या तक्रारीमुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून मंगळवारी पाण्याच्या टाकीच्या व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. ज्या ठिकाणी व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याठिकाणी मागच्या बाजूस बाकावर १०० किलो क्षमतेची क्लोरिन वायूची टाकी ठेवण्यात आली होती.

पण, व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरू असताना एका कर्मचाऱ्याचा या टाकीला धक्का लागला व टाकी जमिनीवर कोसळली. टाकी खाली कोसळताच यातून क्लोरिन वायूची गळती सुरू झाली व बघता बघता वायू रस्त्यावर तसेच निवासी संकुलात पसरू लागला. यामुळे या परिसरातील रहिवाशांना उलटी, श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तर घाबरलेल्या काही जणांनी सैरावैरा पळायला सुरुवात केली.

या घटनेत सुरुवातीला एकूण १९ जणांना खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, तसेच स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. यापैकी देव पार्डिया (५९) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घडलेल्या घटनेबाबत संपूर्ण माहिती घेऊन सखोल चौकशी केली जाईल असे परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले- श्रींगी यांनी सांगितले आहे.

नाल्यात टाकून सिलेंडरची विल्हेवाट

घटना घडताच महापालिका अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळवली. तर घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाने अधिकारी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी क्लोरिनचा सिलेंडर परिसरातून हटवला आहे. मात्र, हा वायू विषारी असल्यामुळे बाधित परिसर सील करण्यात आला असून नागरिकांना या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच क्लोरिन वायूची टाकी गास परिसरातील नाल्यात टाकून तिची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

वायुगतीमुळे दोन इमारत खाली

दिवाणमान परिसरात वायू गळती झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तर कोणतीही जीवितहानी होऊ नये, म्हणून महापालिका अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीसमोरील दोन इमारती खाली केल्या आहेत.