वसई: वसईतील दिवाणमान परिसरात विषारी वायू गळतीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास दिवाणमान येथील पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या वायूच्या सिलेंडरमधून ही गळती झाली आहे. या वायुगळतीमुळे परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला असून, एकूण १९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वसई पश्चिमेच्या भागात दिवाणमान परिसर आहे. या भागात महापालिकेची पाण्याची टाकी आहे. मंगळवारी (२५ नोव्हेंबर) संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास अचानक या पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या क्लोरिनच्या टाकीतून वायूची गळती सुरू झाली. यामुळे परिसरात वेगाने हिरवा विषारी वायू पसरू लागला.

दिवाणमान हा दाट नागरी वस्ती असलेला परिसर आहे. यामुळे वायुगळती होताच हा वायू पाण्याच्या टाकीमागे असणाऱ्या आदिवासी पाड्यात, तसेच निवासी गृहसंकुलात पसरला. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक तसेच या भागातील रहिवासी यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे १९ जणांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. यात अग्निशमन दलाचे कर्मचारी, पालिकेचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांचा समावेश आहे.

महापालिका अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळवली आहे. तर घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाने अधिकारी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी क्लोरिनचा सिलेंडर परिसरातून हटवला आहे. मात्र, हा वायू विषारी असल्यामुळे बाधित परिसर सील करण्यात आला असून नागरिकांना या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच क्लोरिन वायूची टाकी गास परिसरातील नाल्यात टाकून तिची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

या कारणामुळे झाली गळती

दिवाणमान येथील पाण्याच्या टाकीतून आसपासच्या परिसरात पाणीपुरवठा केला जातो. पण, गेल्या काही दिवसांपासून या टाकीचा व्हॉल्व बिघडल्यामुळे पाण्याची गळती सुरू होती. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाण्याच्या टाकीच्या व्हॉल्व दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान दुरुस्ती ज्या भागात सुरू त्याच्या मागच्या बाजूस असणाऱ्या खोलीत १० ते १५ वर्ष जुनी क्लोरिन वायूची टाकी ठेवण्यात आली होती. पण, व्हॉल्व दुरुस्तीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्याचा धक्का या टाकीला लागला आणि टाकी जमिनीवर कोसळली. तर टाकी कोसळल्यामुळे टाकीतून वायू वळती सुरू झाली.

वायुगतीमुळे दोन इमारत खाली

दिवाणमान परिसरात वायू गळती झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तर कोणतीही जीवितहानी होऊ नये, म्हणून महापालिका अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीसमोरील दोन इमारती खाली केल्या आहेत.