वसई: वसई विरारच्या भागातून गेलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी पडलेले खड्डे, काँक्रिटीकरणाच्या कामातील नियोजन शून्य कारभार याबाबत संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी सकाळी खानिवडे टोलनाका बंद पाडला. वसई पूर्वेतील भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावर विरारजवळ खानिवडे टोलनाका आहे.  मुंबई अहमदाबाद महामार्गावर काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे मात्र नियोजन शून्य कारभार दिसून येत असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. याशिवाय वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. अशी परिस्थिती असतानाही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

हेही वाचा : भाईंदर: लग्न मोडल्याने तरुणीची आत्महत्या, ९ व्या मजल्यावरून उडी मारली

परंतु दुसरीकडे सरार्स पणे टोलवसुली सुरू आहे. या रस्त्यावर समस्यांबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणत्याच उपाय योजना केल्या जात नसल्याने महाराष्ट्र काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर वर्तक व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी १० वाजता सुमारास खानिवडे टोल नाका बंद पाडला होता. मागील तीन तीन तासांपासून खानिवडे टोलनाक्यावर काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळे अनेक नागरिकांचे बळी गेले असल्याचा आरोप समीर वर्तक यांनी केला आहे त्यांच्यावर राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी ही त्यांनी केली आहे.जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असेही वर्तक यांनी सांगितले आहे.