वसई : पालघर जिल्ह्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाने विविध प्रकारच्या कारवाया मध्ये वाहने जप्त केली आहेत. मात्र ही वाहने सोडविण्यासाठी मालक पुढे येत नसल्याने अशी वाहने कार्यालयाच्या आवारातच पडून आहेत. त्यामुळे जप्त वाहनांचा ढीग तयार झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वसई प्रादेशिक विभागाकडून नियमबाह्य पद्धतीने वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांवर अधूनमधून कारवाई केली जाते. तर काही कारवायांमध्ये वाहने उचलली जातात. यात ट्रक, रिक्षा, बस व इतर वाहनांचा समावेश आहे. यातील काही वाहनचालक हे वाहने घेऊन जाण्यास परत येत नाहीत. त्यामुळे ही वाहने प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाच्या समोर पडून आहेत. यातील काही वाहने गंजून भंगार झाली आहेत.
दिवसेंदिवस परिवहन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात अशा प्रकारच्या वाहनांचा ढीग वाढू लागला आहे.या वाहनांमुळे जागाही मोठय़ा प्रमाणात अडवली जात आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या वाहनांचे साहित्य ही चोरीला जात असल्याचे प्रकार घडत आहेत. अशी जप्त केलेल्या या वाहनांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आता परिवहन विभागाने कारवाईत उचलेल्या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची प्रक्रिया ही परिवहन विभागाने सुरू केली असल्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पहिल्या टप्प्यात साधारपणे ५० पेक्षा अधिक वाहनांचा लिलाव करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने सांगितले आहे.
परिवहन कार्यालयाच्या आवारात शेकडो गाड्या जप्त आहे. २०२३ नंतर लिलाव झालेला नसून लवकरच हा लिलाव होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे. :- अतुल आदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
वाहन जप्तीची कारणे काय
अपघातातील बेवारस वाहने, मोटर वाहन कर किंवा इतर आवश्यक कर न भरलेली वाहने, सिग्नल तोडणे, वेगमर्यादा ओलांडणे किंवा हेल्मेट न घालता गाडी चालवणे आदी नियमांचे उल्लंघन, बेकायदेशीर कामांसाठी वापर, कागदपत्रे नसणे आदी कारणांवरून परिवहन विभागाकडून जप्त केली जातात.