वसईत सध्या पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या हुकूमशाही आणि विकृतपणाविरोधात संताप उसळला आहे. त्यामुळे एकाच महिन्यात दोनवेळा पोलीस आणि तहसीलदार कार्यालयावर आंदोलने झाली. विश्लेषक ध्रुव राठी याची चित्रफीत व्हॉटसअ‍ॅप समूहात टाकल्याने वकिलावर दाखल झालेला गुन्हा, क्षुल्लक वादातून पोलीस चौकीत विक्रेत्याला झालेली मारहाण यामुळे पोलीस दलाविरोधात संताप होता. त्यातच विलास करे-पाटील नावाच्या विकृत तलाठ्याने कार्यालयातच महिलेचा विनभभंग केल्याने वसईकरांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. घटना वेगवेगळ्या असल्या तरी मस्तवाल अधिकाऱ्यांना असलेला माज, उन्मतपणा दाखवणाऱ्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२१ ची घटना.. डहाणूतील आदिवासी कष्टकरी महिला पोट भरण्यासाठी वसईत आल्या होत्या. त्यांच्यावर स्थानिकांनी चोरीचा आरोप घेतला. पापडीच्या चौकीत संशयावरून पोलीस अधिकार्‍याने या ६ महिलांना बेदम मारहाण केली. या घटनेचे तीव्र पडसाद वसईत उमटले होते. आदिवासी संघटना आक्रमक झाल्या होत्या. मारहाण करणारा पोलीस उपनिरीक्षक विनोद वाघ याला निलंबित करण्यात आले होते. पोलीस अधिकारी कशी गुंडगिरी करून माज दाखवतात त्याची ही घटना प्रतिक होतं. मात्र या घटनेनंतरही पोलिसांनी बोध घेतला नाही. नुकत्याच घडलेल्या ३ घटना पोलीस आणि शासकीय अधिकाऱ्यांचा माज आणि गुंडगिरी दर्शविणार्‍या आहेत.

हेही वाचा – वसई: बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई सुरू; करंजा येथील ७ बोटींवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई

राजकीय विश्लेषण करणार्‍या विश्लेषक ध्रुव राठी याच्या चित्रफिती कोट्यावधी लोकं बघतात आणि शेअर करत असतात. त्यात काहीच वावगं नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो भाग आहे, अधिकार आहे. २० मे रोजी मतदानाच्या दिवशी वसईतील सामाजिक कार्यकर्ते आणि मार्कस्वादी कम्युनिस्ट पक्षाचे (लेनिन) राज्य सचिव असलेल्या ॲड आदेश बनसोडे यांनी ध्रुव राठी याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी एक चित्रफीत व्हॉटसअ‍ॅप समूहावर प्रसारीत केली. मतदानाला जाताना याचा विचार करा असा संदेश टाकला. खरंतर वावगं काहीच नव्हतं. मात्र माणिकपूर पोलिसांनी त्यांच्यावर मतदारांना प्रभावित करणारी कृती केल्याचा ठपका ठेवून ॲड बनसोडे यांच्यावर गुन्हा दाखल केला. ज्या ध्रुव राठीच्या चित्रफिती कोट्यावधी लोकं बघतात, चर्चा करतात ती शेअर केल्याने गुन्हा? ही बाब संतापजनक होती. मनाई आदेशाचा भंग केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी आमच्यावर दबाव होता असे पोलीस खासगीत सांगत होते. म्हणजे कुणाच्या दबावात पोलीस काम करत होती. आमच्याविरोधात बोलाल तर गुन्हा दाखल होईल असा इशाराच या कृतीतून देण्यात आला होता.

याच काळात वसईत घडलेली एक घटना. एका चावी विक्रेत्याचा ग्राहकाशी २० रुपयांवरून वाद झाला. प्रकरण पोलीस चौकीत गेले. तेथे असलेल्या पोलीस उपनिरीक्षक राजशेखर सलगरे याने चावी विक्रेता मोहम्मद अली अहमद अली अन्सारी याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. त्याचे नाक फोडले. परंतु निर्ढावलेल्या पोलिसानी सलगरे याच्याविरोधात ना गुन्हा दाखल केला ना त्याला निलंबित केले. घटनेला दहा दिवस उलटून गेले होते. या प्रकरणाची माध्यमांनी वाचा फोडली. पण पोलीस ढिम्म होते. अखेर वंचित बहुजन आघाडीचे पालघर जिल्हाध्यक्ष सुशांत पवार यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडले आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या या मुजोरपणा आणि हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात संताप उसळला. सर्व पक्ष, संस्था एकत्र आल्या आणि पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. आंदोलन करून पोलिसांच्या हुकूमशाही प्रवृत्तीला वाचा फोडण्यात आली. त्यामुळे मारहाण करणारा पोलीस उपनिरीक्षक सलगरे याला निलंबित करण्यात आले.

हेही वाचा – वसई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून वर्सोवा सूर्या प्रकल्प दुर्घटनेची पाहणी, बचाव कार्य पुन्हा सुरू

ही दोन प्रकरणे शांत होत नाहीत तोवर आणखी एक संतापजनक घटना घडली. वसईच्या वासळई येथील तलाठी विलास करे-पाटील याने कार्यालयात आलेल्या एका महिलेचा विनयभंग केला. महिलेने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याला शाही वागणूक दिली. वातानुकूलीत कक्षात बसून त्याचा जबाब घेतला. त्याला अटक न करत नोटीस दिली आणि जामीन मिळवून दिला. त्यामुळे वसईकरांच्या संतापात भर पडली. तलाठी विलास करे-पाटील याच्या विरोधात यापूर्वी देखील महिलांनी तक्रारी केल्या होत्या. एकदा तर पोलीस ठाण्यात महिलेने त्याला मारहाण करून धडा शिकवला होता. लाचलुचपत विभागाने अटक केल्यानंतर तो एक वर्ष निलंबित होता. मात्र त्याला पदाचा असलेला माज आणि लाचेच्या रुपात गोळा केलल्या अफाट पैशांचा माज होता. त्यामुळे त्याची हिंमत वाढली होती. पुन्हा वसईकर एकत्र जमले आणि तहलीसदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महिलांनी धरणे आंदोलन केले. अखेर तलाठी विलास करे-पाटील याला निलंबित करण्यात आले.

पोलीस असो वा शासकीय अधिकारी. यांना एवढी गुर्मी आणि माज येतो कुठून? असा प्रश्न आहे. प्रचंड भ्रष्टाचारामुळे आलेला पैसा आणि पदाची ताकद यामुळे अधिकार्‍यांना माज, गुर्मी आलेली असते. या भ्रष्ट अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. संविधान बदलाच्या चर्चा या निवडणुकीत झाल्या. संविधान बदलले नसले तरी हुकूमशाहीची पाळेमुळे रूजू लागली आहेत. अभिव्यक्ती स्वांतंत्र्यावर गदा आणली जात आहेत. मस्तवाल अधिकारी काळ्या पैशांच्या जोरावर गुर्मी दाखवत आहे. भर दिवसा कार्यालयात महिलेचा विनयभंग होत असेल यावरून या छंदीफंदी, विकृत अधिकार्‍यांची वृत्ती काय असेल याची कल्पना येते. या घटना प्रतिकामत्मक आहे. सुसंस्कृत वसईकरांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला ही एक समाधानाची बाब. अशी एकजूट कायम रहायला हवी. अन्यायाविरोधात लढण्यासाठी लोकशाहीची मूल्ये आणि संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांना यापुढे दक्ष राहून लढ्यात उतरावे लागणार आहे. हे संकट प्रत्येक नागरिकांच्या डोक्यावर घोंघावत आहे, एवढे लक्षात असू द्या.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai there is currently an outcry against the authoritarianism and perversity of the police and revenue officials ssb