वसई : वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात ठेकेदाराकडून कचरा वाहतूक करण्यासाठी धोकादायक व कालबाह्य झालेली वाहने वापरली जात आहे. अशा वाहनांमुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला असून अशा वाहनांची तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मागील काही वर्षापासून वसई विरार शहराचे नागरीकरण वाढले आहे. त्यामुळे शहरातून दैनंदिन निघणाऱ्या कचऱ्यात ही वाढ झाली आहे. शहरातून दररोज आठशे मॅट्रिक टन कचरा गोळा होतो. या कचऱ्याचे संकलन करण्यासाठी पालिकेने २० झोन तयार केले असून त्यासाठी ठेके दिले आहेत. कचरा वाहतूक व संकलन करण्यासाठी पालिकेची ६३ कॉम्पॅक्टर, १०८ टिपर, आणि खासगी वाहने ५७ यांचा वापर केला जात आहे. या वाहनात कचरा भरून तो कचरा भूमीवर नेऊन टाकला जात आहे.

मात्र कचरा वाहतुकीसाठी वापरली जाणारी काही वाहने अनेक वर्षे जुनी झाली आहेत. तर काही वाहने भंगार झाली आहेत. तरी सुद्धा अशा वाहनातून कचऱ्याची वाहतूक होत असते. या वाहनांची देखभाल व दुरुस्ती ही योग्य रित्या होत नसल्याने अनेकदा तांत्रिक बिघाड होऊन वाहने बंद पडतात.
विशेषतः काही वाहने कालबाह्य झालेली आहेत. अशा वाहनांची तपासणी होत नसल्याने सर्रास पणे ती वापरात आणली जात आहे.

अशा जीर्ण झालेल्या वाहनांची वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे आहे तसे होत नसल्याने काही ठेकेदार ही सर्रासपणे जुनी वाहने वाहतुकीला वापरत आहेत. अशा जुनाट वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. काही वाहने इतकी जीर्ण झाली आहेत की कधीही त्याचे साहित्य निखळून पडेल सांगता येत नाही. काही वाहनांचा वाहन क्रमांक दिसून येत नाही.

वाहनांची तपासणी करण्याची मागणी

वसई विरार शहरात कचरा वाहतुकीसाठी कालबाह्य झालेली वाहने ही वापरली जात आहेत. त्यामुळे त्यातून निघणारा काळा धूर यामुळे प्रदूषण निर्माण होत आहे.तर दुसरीकडे त्यांची परिवहन विभागाकडून फिटनेस ही तपासून न घेताच तशीच चालविली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

फिटनेस तपासूनच वापरात

कचरा संकलन व वाहतूक करण्यासाठी पालिकेकडून जी वाहने वापरली जातात. त्या सर्व वाहनांचे परिवहन विभागाकडून फिटनेस तपासून फिटनेस प्रमाणपत्र घेतले जाते. त्यानंतरच त्या वापरात आणल्या जात असल्याचे महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी सांगितले आहे. ज्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र नाहीत ती वाहने घेतली जात नाहीत असेही त्यांनी सांगितले आहे.