वसई: वसई विरार शहर पालिकेच्या आरोग्य विभागाला बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या सातिवली येथील माता बाल संगोपन केंद्रातील औषधांची नमुने तपासणी केली असता. त्यात बनावट औषध गोळ्यांचा पुरवठा होत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात पुरवठादारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरविली जाते. पालिकेने आरोग्य विभागाला औषध पुरवठा करण्यासाठी पुरवठादार नियुक्त केले असून त्यांच्या मार्फत पालिकेची रुग्णालये, आरोग्य केंद्र, माताबाल संगोपन केंद्र अशा ठिकाणी औषधांचा पुरवठा केला जातो.

नुकताच वसई पूर्वेच्या सातीवली येथील माताबाल संगोपन केंद्रात पुरवठा करण्यात येणाऱ्या काही औषधांचे १० अनौपचारिक नमुने अन्न औषध प्रशासनाने तपासणीसाठी घेतले होते ह्या तपासणी दरम्यान त्या औषधामध्ये बनावट असल्याचे आढळून आल्याचे अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यात ज्यांनी औषध पुरवठा केला अशा पुरवठा दारांची चौकशी केली होती. यात त्यांना ज्या भागातून औषध साठा खरेदी विक्री केला यांची माहिती मागविण्यात आली होती. मात्र त्यांची योग्य ती माहिती त्यांच्या मार्फत आली नसल्याने औषध पुरवठादार मे प्रणिक एंटरप्राइजेस व अन्य सहा पुरवठा दार यांच्या विरुद्ध भारतीय न्याय दंड संहिता कलम ३१८(४), ३३६(३), ३४०(२),२७८, ३ (५) सह औषधी द्रव्य व सौंदर्यप्रसाधन अधिनियम १९४० चा कलम १७(ब) नुसार वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती औषध निरीक्षक सतीश चव्हाण यांनी सांगितले आहे.

बनावट औषधांचा पुरवठा करणारे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे या बनावट औषध गोळ्या पुरवठा प्रकरणातील मुख्य सूत्रधार विजय शैलेंद्र चौधरी हा दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये सध्या नागपूरच्या तुरुंगात असल्याचे ही अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. या अशा प्रकारच्या बनावट औषधांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी पालिकेला जे पुरवठादार औषध साठा पुरवतात त्यांची व त्या औषधांची पडताळणी करून घ्यावी अशी मागणी आता नागरिकांमधून करण्यात येत आहे.

पालिकेकडून तपासणी केल्याचा दावा

वसई विरार महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जो औषध साठा येतो. त्याची तपासणी करूनच घेतली जात आहे. औषधांच्या संदर्भातील प्रमाणपत्र, पुरवठा दार यांची कागदपत्रे, औषधांची माहिती अशा सर्व बाबी तपासून घेतल्या जात असल्याचा दावा महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी यांनी केला आहे. तसेच ज्या प्रमाणे तक्रारी येतील त्यानुसार महापालिका तपासणी करीत आहे असेही त्यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या बनावट औषधं पुरवणाऱ्या कंपन्या व संबंधित ठेकेदार यांच्या विरोधात कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी शिवसेना (ठाकरे) पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील यांनी केली आहे. याशिवाय जी रुग्णालये आहेत त्यांची तपासणी करण्यात यावी जे दोषी आढळून येतील त्यावर ही कारवाई करावी. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पाटील यांनी दिला आहे.