वसई:- वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाला बनावट औषध पुरवठा होत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर महापालिका खडबडून जागी झाली आहे. आता महापालिकेकडून औषध पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांच्या औषधांची तपासणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे जो बनावट औषधसाठा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

वसई विरार शहरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सेवा पुरविली जाते. या आरोग्य सेवेसाठी सद्यस्थितीत शहरात पालिकेची २ माताबाल संगोपनकेंद्र, ७ रुग्णालये, २१ प्राथमिक आरोग्य केंद्र, १५ आपला दवाखाना, ३५ आयुष्यमान आरोग्य वर्धिनी केंद्र आहेत. त्याद्वारे नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरविली जाते. पालिकेने आरोग्य विभागाला औषध पुरवठा करण्यासाठी १० पुरवठादारांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याद्वारे औषधांचा पुरवठा केला जातो.

नुकताच पालिकेच्या वसई पूर्वेच्या सातिवली येथील माता बाल संगोपन केंद्रात बनावट औषध खरेदी विक्री केली जात असल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. याप्रकरणी मे प्रणिक एंटरप्राइजेस व अन्य सहा औषध पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांविरोधात विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.बनावट औषध घोटाळा समोर आल्यानंतर या प्रकरणाचे तीव्र पडसाद शहरात उमटू लागले आहेत. रुग्णांना जर अशा प्रकारे बनावट औषधे दिली जात असतील तर त्यातून रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी या प्रकाराला गंभीरतेने घेऊन बनावट औषध पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती.

या घटनेनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली असून महापालिकेला औषध पुरवठा होणाऱ्या औषधांची नमुने तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून रुग्णालये व आरोग्य केंद्र यातील पाच वेगवेगळ्या औषधांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. याशिवाय यापूर्वी मे. प्रणिक एंटरप्राइजेस या ठेकेदाराने बनावट औषध साठा पुरवठा केल्याप्रकरणी त्याला काळ्या यादीत टाकून त्याचा ठेका रद्द करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी सांगितले आहे.

अन्न औषध प्रशासनासोबतच महापालिकेने ही औषध साठ्यांची तपासणी वाढविली आहे. औषधांची नमुने तपासणी करूनच औषध साठा घेतला जाईल. जेणेकरुन भविष्यात अशा प्रकारच्या बनावट औषधांवर वेळीच आळा घालणे शक्य होईल. :- डॉ. भक्ती चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी महापालिका

अन्न औषध प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली नवीन निविदा.

औषधांच्या संदर्भातील प्रमाणपत्र, पुरवठा दार यांची कागदपत्रे, औषधांची माहिती अशा सर्व बाबी तपासून औषध पुरवठा घेतला जात होता. आता यापुढे औषधसाठा खरेदीसाठी अन्न औषध प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली नवीन निविदा काढल्या जातील असेही महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी कायम

बनावट औषध प्रकरणानंतर महापालिकेने औषधांची तपासणी वाढविली आहे. असे जरी असले तरी यापूर्वी महापालिकेने औषध खरेदी करताना पालिकेचे वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर यांनी योग्य ती तपासणी केली नव्हती का ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. केवळ ठेका रद्द करून चालणार नाही तर ज्यांनी हा ठेका दिला अशा अधिकाऱ्यांच्या चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.