वसई : वसई विरार मध्येही मान्सून दाखल झाला आहे. शनिवारी पहाटे अवघ्या दहा मिनिटं पडलेल्या पावसात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीवर परिणाम होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. सद्यस्थितीत या महामार्गावर प्राधिकरणाकडून काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. परंतु त्याचे नियोजन नसल्याने जागो जागी खड्ड्यांची समस्या, रस्त्याची उंच सखल स्थिती कायम आहे.

शनिवारी पहाटे पावसाने वसईत हजेरी लावली होती. त्याचा परिणाम हा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दिसून आला. मालजीपाडा, नायगाव या भागात खड्डे असल्याने त्यात पाणी साचून होते. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. चिंचोटी महामार्ग वाहतूक पोलिसांनी वाहतूक समस्या सुटावी यासाठी स्वतः पुढाकार घेत तात्पुरता खड्डे दुरूस्त करण्याचे काम करून वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा : पश्चिम रेल्वेची विरार- डहाणू सेवा विस्कळीत; विरारच्या नारंगी फाटकाजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड

मात्र महामार्ग प्राधिकरणाचे कोणीही ठिकाणी लक्ष देण्यासाठी नव्हते. अवघ्या दहा मिनिटांच्या पावसात ही अवस्था आहे तर अजून पावसाळ्याचे तीन महिने बाकी आहेत त्यामुळे यंदाही महामार्गावर नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.