वसई: अर्नाळा समुद्रात उडी मारून एका अल्पवयीन जोडप्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. स्थानिक जीवरक्षकाने मुलीला वाचविण्यात यश मिळवले आहे. मात्र मुलगा बुडाला असून त्याचा शोध सुरू आहे. विरार पश्चिमेला राहणारे १७ वर्षांचे एक अल्पवयीन जोडपे तीन दिवसांपूर्वी घर सोडून पळून गेले होते. शनिवारी अर्नाळा सागरी पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. दोघांचे जबाब नोंदवून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले होते. हेही वाचा : वसई: चालत्या एसटीचे चाक निखळले, सुदैवाने जीवितहानी टळली संध्याकाळी ६ च्या सुमारास हे जोडपे अचानक नजर चुकवून पोलीस ठाण्यासमोर असलेल्या समुद्रकिनारी गेले आणि समुद्रात उडी मारली. स्थानिकांनी बुडणाऱ्या मुलीला वाचवले तर बुडालेल्या मुलाचा शोध सुरू आहे, अशी माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली.