परिसरातील नागरिकांना वेळ, पैशाचा अधिकचा खर्च

वसई : वसई पश्चिमेतील नाळा या भागातील पालिकेचे विभागीय कार्यालय मागील दीड वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे घरपट्टी, पाणीट्टी भरणा यांसह कामासाठी ये जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे.

वसई पश्चिमेतील भागात नाळा परिसर आहे. या भागात ग्रामपंचायत काळापासूनचे कार्यालय आहे. परंतु वसई-विरार पालिका अस्तित्वात आल्यानंतर हे कार्यालय पालिकेने ताब्यात घेऊन या भागातील दैनंदिन कामकाज या कार्यालयातून सुरू केले होते. करोना कालावधीमध्ये हे कार्यालय पालिकेने बंद केले आहे. सुमारे दीड वर्षांपासून बंद  असल्यामुळे येथील समस्त नाळे भागातील जनतेची गैरसोय होत आहे. विशेषकरून घरपट्टी भरणा, जन्मदाखला, मृत्यू व जन्म नोंद, दिवाबत्ती व इतर सुविधांसाठी येथील लोकांना  नालासोपारा अथवा वाघोली इत्यादी दूरवरच्या ठिकाणी पायपीट करुन जावे लागत आहे. विशेष म्हणजे तिथे जाण्यासाठी सार्वजनिक परिवहनाची योग्य प्रकारे सुविधा नसल्याने येथील जनतेस रिक्षा किंवा इतर खासगी वाहनातून जाण्यासाठी आर्थिक भार व वेळ खर्च करावा लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते चार्ली रोझारिओ यांनी सांगितले.

आता करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून सर्व काही पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे पालिकेने नाळा या भागातील बंद केलेले विभागीय कार्यालय पुन्हा सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.