scorecardresearch

शहरांतील गुन्हेगारीत वाढ

मिरा भाईंदर आणि वसई विरार शहरातील हत्या, चोरी, बलात्कार, दरोडे आदी गंभीर गुन्ह्यांत २०२१ मध्ये वाढ झाली आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

वसई, भाईंदरमध्ये गुन्ह्याची उकल ६८ वरून  ७५ टक्के

वसई: मिरा भाईंदर आणि वसई विरार शहरातील हत्या, चोरी, बलात्कार, दरोडे आदी गंभीर गुन्ह्यांत २०२१ मध्ये वाढ झाली आहे. मात्र त्याच वेळी या गंभीर गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाणही वाढले आहे. आयुक्तालयात पहिल्यांदाच गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण ६८ टक्क्यांवरून ७५ टक्के एवढे झाले आहे. पोलिसांनी सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

मिरा भाईंदर वसई विरार या नव्या पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने मागील वर्षांच्या तुलनेत २०२१ या वर्षांतील गुन्हे आणि पोलिसांच्या एकंदरीत कामगिरीचा आढावा घेणारा अहवाल पोलीस आयुक्तालयाने सोमवारी प्रसिद्ध केला. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. करोना नियमांचे पालन करण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे एकाच वेळी वसई आणि विरारमधील दोन्ही परिमंडळांत या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करून आयुक्तांनी संवाद साधला. या अहवालानुसार खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, चोरी, घरफोडी, जबरी चोरी, वाहन चोरी आदी गुन्ह्यांमध्ये २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये वाढ झाली आहे.

गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण वाढले

एकीकडे गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास केल्याने गुन्ह्यांचे उकल करण्याचे प्रमाण या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी वाढले आहे. यापूर्वी गुन्ह्यांचे उकल करण्याचे प्रमाण ६८ टक्के होते. या वर्षी ते ७५ टक्के एवढे झाले आहे. याबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल आम्ही घेत आहोत. त्यामुळे गुन्ह्यांची आकडे वाढत आहे. परंतु त्याची पर्वा न करता आम्ही गुन्ह्यांची उकल करण्यावर भर देत आहोत. गुन्हे शाखा आणि विशेष तपास पथकांच्या मदतीने प्रत्येक गुन्ह्याचा तपास करत असल्याने गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण ७५ टक्के एवढे झाले आहे. खुनासह जबरी चोरी ( १०० टक्के), खून (९० टक्के) दरोडा (१०० टक्के), जबरी चोरी ( ६८ टक्के), सोनसाखळी चोरी (६६ टक्के) वाहन चोरी ( ३३ टक्के), दिवसा घरफोडी (६१ टक्के), इतर जबरी चोरी ( ६९ टक्के)  एवढे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत जबरी चोरीची उकल ५ टक्क्यांनी, सोनसाखळी चोरीची उकल ११ टक्क्यांनी , घरफोडी १६ टक्क्यांनी तर वाहनचोरी ८ टक्क्यांनी वाढली आहे. २०२१ या वर्षांत सर्व गुन्ह्यांत मिळून २५ कोटी ३४ लाख २१ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. पोलिसांनी तपास करून त्यातील ११ कोटी ७४ लाख ७३ हजारांचा म्हणजेच ४६ टक्के मुद्देमाल परत मिळवला आहे.

गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आम्ही केलेल्या एकत्रित प्रयत्नांना यश आले आणि त्याचे प्रमाण प्रथमच ७५ टक्क्यांनी वाढले आहे. पोलीस आयुक्तालयात भरोसा सेल, दहशतवाद विरोधी कक्ष, सदोष मनुष्यवध शाखा, अमली पदार्थविरोधी शाखा, बेपत्ता मुले आणि महिला शोध कक्ष, अनैतिक मानवी वाहतूक शाखा आदी विविध शाखा स्थापन करून गुन्ह्यांची उकल करत आहोत शिवाय कायदा आणि सुव्यवस्थादेखील अबाधित राखण्यात यश मिळवले आहे.

– सदानंद दाते- पोलीस आयुक्त, मिरा भाईंदर, वसई विरार

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Increase crime cities police ysh

ताज्या बातम्या