लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी वसई : एकीकडे सायबर गुन्हे वाढत असताना दुसरीकडे पोलिसांच्या तपासामुळे अशा गुन्ह्यात फसवणूक करून लंपास करण्यात आलेली रक्कम देखील परत मिळविण्यात पोलिसांना यश येत आहे. सायबर पोलिसांनी मागील ८ महिन्यात १३१ प्रकरणात २ कोटींहून अधिक रक्कम परत मिळवण्यात यश आले आहे. सध्या प्रत्येकाकडे स्मार्ट फोन आल्याने ऑनलाईनचा वापर वाढला आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगार देखील लोकांची फसवणुक करण्यास सक्रीय झाले आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. विविध प्रकारे नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे. वेगवेगळे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात येत असते. परंतु वेळीच तक्रार केल्यास ही रक्कम गोठवून ती तक्रारदारांना परत देण्यात येते. आणखी वाचा-नालासोपार्यातील विद्यार्थीनीवर बलात्कार प्रकरण: आरोपींच्या कलमांत वाढ, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश चालू वर्षात मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडे आर्थिक फसवणूक व इतर सोशल मिडीया संबंधित १ हजार ८५२ तक्रारी आल्या होत्या. त्यामधील सायबर आर्थिक फसवणूकीशी संबंधित सुमारे १ हजार २८० तक्रारी होत्या. त्यापैकी १०३ तक्रारदारांची ९५ लाख रुपयांची रक्क सायबर पोलीस ठाणे मधून कार्यवाही केल्यामुळे परत करण्यात आली. २८ तक्रारदारांची १ कोटी १० लाख रुपयांची रक्कम सायबर पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करुन थांबविली व त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर तक्रारदारांना परत करण्यात आली. सायबर पोलिसांनी एकूण २ कोटी ५ लाख रुपयांची रक्कम तक्रारदारांना परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजीत गुंजकर यांनी दिली. फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ वसई विरार आणि मीरा रोड, भाईंदर शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत वाढले आहे. २०२३ मध्ये सायबर पोलिसांकडे एकूण १२ हजार ७५७ तक्रारी होत्या. त्यात संकेतस्थळ आणि हेल्पलाईवरून ९ हजार ६०० तर प्रत्यक्ष अर्ज देऊन आणि ईमेलद्वारे ३ हजार १५७ तक्रारी करण्यात आल्या होत्या. २०२२ मध्ये केवळ ७ हजार २५६ तक्रारी होत्या. म्हणजे २०२३ या वर्षात सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. विशेष बाब म्हणून या प्रकारच्या फसवणूकीला बळी पडणारे नागरिक हे उच्च शिक्षित, तंत्रस्नेही आहेत, तरी देखील निव्वळ आमिषापोटी ते सायबर फसवणूकीला बळी पडत आहेत. आणखी वाचा-वसईत गणेशोत्सव की फलकोत्सव? फलकांमुळे शहर विद्रूप, रस्ता अडवून मंडप उभारणी फसवणूक झाल्यास काय करावे? सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ तक्रार केल्यास फसवणूकीतील रक्कम परत मिळवता येते. जर फसवणूक झाली तर त्वरीत १९०३ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवावी. २४ तासांच्या आत तक्रार झाल्यास रक्कम गोठवता येते. यानंतर संबंधित पोलीस ठाण्याकडे तक्रार नोंदवाली. पोलीस पाठपुरावा करून फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देऊ शकतात. काय सावधानता बाळगणे आवश्यक आहे बँकिंग व्यवहार करतांना एटीएम कार्ड/क्रेडीट कार्ड यांचे परकीय देशातील व्यवहार हे ऑप्शन कायम बंद ठेवावे. बँकिंग व्यवहाराची दैनंदिनी कमाल मर्यादा बँकेला माहिती देवून निश्चित करुन ठेवावी. युपीआय व्यवहार करतांना पैसे स्विकारण्याकरीता कधीही पिन मागीतल्या जात नाही, त्यामुळे क्यूआर कोड स्कॅन करताना पैसे स्विकारण्यासाठी पिन टाकू नये. आणखी वाचा-मिरा रोड येथे सर्वधर्मीय दफनभूमीचा निर्णय मागे पिनचा वापर फक्त युपीआयव्दारे पैसे पाठविण्याकरीताच होतो. क्रेडीट कार्ड रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याचे नादात कोणत्याही अनोळखी लिंक, वेबसाईट अथवा मोबाईल फोनवर ॲप डाउनलोड करु नये फसव्या एसएमएसपासून सावध राहावे. टेलीग्राम, व्हाटसअप यांचेद्वारे प्राप्त कोणतीही लिंक, ॲप डाउनलोड करु नये, त्यामुळे मोबाईल हॅक होण्याचा मोठा धोका संभवतो.